Thursday 9 April 2015

महिला पत्रकाराला लुटण्याचा प्रयत्न

ठाणे : रेल्वे स्थानक परिसरात महिलांचा विनयभंग व सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत असतानाच पुन्हा एकदा लोकलमधून रात्री प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनीषा गुरव (३५) ही महिला पत्रकार रात्रीच्या वेळी सेकंड क्लास महिला डब्यातून प्रवास करत असताना कळवा स्थानकादरम्यान एका चोरट्याने त्यांचा मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करत असताना चोरट्याने गुरव यांना फरफटत दारावरच्या पोलपर्यंत आणले. या घटनेमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुलुंड स्थानक येथून मनीषा गुरव यांनी मध्यरात्रीनंतरची शेवटची कर्जत लोकल पकडली. लोकल कळवा स्थानकात प्रवेश करताच साधारण २५ वर्षांच्या एका चोरट्याने महिलांच्या डब्यात शिरून मनीषा यांची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मनीषा यांनी चोरट्याला विरोध करताच त्याने मनीषा यांना फरफटत लोकलच्या दरवाज्यापर्यंत आणले. लोकलमधून खाली पडण्याच्या बचावात असतानाच चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून त्याने पोबारा केला. या वेळी डब्यात उपस्थित असणार्‍या ३-४ महिला प्रवाशांनी चोरट्याला अडवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना रात्री उशिरा घडली, तेव्हा डब्यात शस्त्रधारी पोलीस नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रशासन महिलांच्या सुरक्षिततेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते.बुधवारी सकाळी मनीषा गुरव यांनी या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साभार दैनिक "पुण्यनगरी"
http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=4/9/2015%2012:00:00%20AM&queryed=10&a=2&b=82604