Saturday 4 April 2015

डिस्कव्हरी चॅनेलच्या तोतया पत्रकाराला अटक

मुंबई : डिस्कव्हरी चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगून भाड्याने महागडे कॅमेरे, लेन्स घेऊन लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या तोतयाला सायन पोलिसांनी हिमाचल प्रदेश येथून अटक केली आहे. 

विलेपार्ले, राम मंदिरजवळ सनशाईन अपार्टमेंट या ठिकाणी राहणारा मिलिंद भरतकुमार भट्ट (२७) याने सायन येथील सेंट्रल रेल्वे कॉर्टरमध्ये राहणारा शौकत आजमतुल्ला खान (३0) याला आपण डिस्कव्हरी चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगून खोटे ओळखपत्र दाखवून शूटिंगच्या बहाण्याने खान याच्याकडील कॅमेरा, झूम लेन्स अशी मालमत्ता सात दिवसांच्या मदतीवर नेऊन ती परत न करता खान याची फसवणूक केली. खान याने या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात भट्ट याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. सायन पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात भट्ट हा सराईत आरोपी असून तो स्वत: डिस्कव्हरी चॅनेलचा पत्रकार असल्याचे भासवून चेन्नई, दिल्ली, बंगरुळू, गोवा, मुंबई या ठिकाणच्या लोकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. भट्ट याच्याविरोधात कोणतीही माहिती नसताना त्याने स्वत:चे मोबाइल फोन बंद ठेवले असताना गोपनीय माहितीवरून कौशल्याने तपास करून भट्ट हा शूटिंगच्या बहाण्याने हिमाचल प्रदेश, कुलू मनाली येथे असल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त केली. आरोपी मिलिंद भट्ट याने कुलू मनालीतील व्यापारी, हॉटेल मालक, ट्रान्सपोर्ट मालक यांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिलिंद भट्ट याला स्थानिक लोकांच्या मदतीने ड्रंगन चौक, ओल्ड मनाली, हिमाचल प्रदेश येथून अटक केली. मिलिंद भट्ट याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील चांदणी चौक, लाजपत नगर तसेच मुंबईतून १३ लाख ५ हजार रुपये किमतीचे कॅमेरे, झूम लेन्स मॉनिटर, टॉय पॉय आदी फसवणूक करून लुबाडलेली मालमत्ता हस्तगत केली. आरोपी भट्ट याचा कोणी साथीदार आहे का, याचा तपास सायन पोलीस करीत आहेत.