Thursday 21 May 2015

मुख्यमंत्र्यांचे मीडियाला टोले

मुंबई  - एखाद्या विषयावर मतमतांतरे असू शकतात, पण याचा अर्थ सरकारमध्येच मोठा वाद आहे असा होत नाही. मी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियमित संपर्कात असतो आणि त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद होत असतो. त्यामुळे आमचं बरं चाललंय हे लक्षात घ्या, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. जैतापूर प्रकल्प, भूसंपादन कायदा, स्वतंत्र विदर्भ या मुद्द्यांवर शिवसेना सातत्याने विरोधी भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकारमध्येच विसंवाद आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला. तेव्हा त्यांनी भाजप-शिवसेनेत कोणताही विसंवाद नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, मी स्वत: नियमित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात असतो, त्यांच्याशी नियमित संवाद साधत असतो. सरकारमध्ये एकमतानेच निर्णय होत असतात. एखाद्या विषयावर जर वेगळे मत असेल तर आम्ही एकमत होईपर्यंत थांबतो. घाईघाईने एकतर्फी निर्णय घेत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपात वाद आहे असे राष्ट्रवादीला वाटत असते, मात्र पत्रकारांनी तसे वाटून घेऊच नये असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लगावला.