Wednesday 6 May 2015

संपूर्ण" मीडिया'च्या विपश्‍यनेची गरज

नवी दिल्ली - संपूर्ण मीडियाचीच विपश्‍यना करण्याची गरज असल्याचे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (5 मे 2015) व्यक्त केले. 

आम आदमी पक्षाचे माजी नेते आशिष जोशी यांनी दिल्ली सरकारची तातडीने विपश्‍यना करण्याची गरज असल्याची टीका केली होती. या मुद्याला हात घालत सिसोदिया यांनी सरकारऐवजी प्रसारमाध्यमांचीच विपश्‍यना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षावर प्रसारमाध्यमे टीका करीत आहेत. जोशी यांनी केलेल्या टीकेचाही सिसोदिया यांनी आपल्या भाषणात समाचार घेतानाच थेट प्रसारमाध्यमांनाच लक्ष्य केले. 

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या सुरात सूर मिसळतानाच मीडिया "आप‘ सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी काही पत्रकारांनी आपला पक्ष संपविण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता. "आप‘चे नेते कुमार विश्वास यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपानंतर केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मीडियावर आगपाखड केली. विश्‍वास यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. अशाप्रकारे एखाद्याची बदनामी करणे योग्य आहे का? हे राजकारण आहे का? कोणताही पुरावा नसताना आरोप केले जात असल्याबद्दल केजरीवाल यांनी खेद व्यक्त केला.