Monday 4 May 2015

गो होम इंडियन मीडिया - - नेपाळी जनतेचा संताप

नवी दिल्ली - नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या जखमा भळभळत असताना आणि या तीव्र दुःखातून तेथील जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचे कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. रविवारी दिवसभरात सुमारे १ लाख ४४ हजार ट्विट पडले होते. 

भूकंपात कुणाचा संसार उद्ध्वस्त झालाय तर कुणाचे संपूर्ण कुटुंबच काळाने हिरावून नेलंय. अनेकांना बेघर व्हाव लागलंय तर अनेकांचा अद्याप शोधच लागलेला नाही. अशा या विनाशकारी भूकंपाच्या खोलवर झालेल्या जखमा अंगावर झेलत जगण्यासाठी धडपडणाऱ्या नेपाळमधील नागरिकांना मदत करण्याऐवजी भारतीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी 'कव्हरेज'मध्येच गुंतले होते. त्यांच्यातील संवेदनशीलता हरवली होती. भूकंपपीडितांच्या समोर 'बूम' धरण्यातच त्यांनी धन्यता मानली होती. हा सर्व प्रकार सुरक्षा दलाच्या जवानांसमोरच चालला होता. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे पीडितांना ते 'तुम्हाला कसे वाटते?' असे प्रश्न विचारत होते. या सर्व प्रकारावर नेपाळवासियांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. 

भारतीय लष्कराचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान कशा प्रकारे बचाव आणि मदतकार्य करण्यात आघाडीवर आहेत, याचेच वृत्त प्रसारित करून भारताची पाठ थोपटण्याचे काम भारतातील इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मिडियाने केले, असा आरोप नेपाळमधील नेटकऱ्यांनी ट्विटरवर केला. 

अनेकांनी भारतीय प्रसारमाध्यमे कमालीची असंवेदनशील आहेत, अशी टीका ट्विटरवरून करत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या नैतिकता गमावलेल्या वृत्तांकनातून प्रसारमाध्यमांनी नेपाळ आणि भारतातील संबंधांचा चुराडा केला, अशी प्रखर टीका करतानाच 'भारतीय प्रसारमाध्यमांनो, आता तुमची गरज वाटत नाही, तुम्ही परत जा' असे टि्वट केले. 

भूकंप झाला त्यानंतर काही तासातच भारतीय वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी नेपाळमध्ये पोहोचले. त्यांनी दाखवलेल्या बातम्यांमधून नेपाळमधील उद्ध्वस्त चित्रण सर्व जगाने पाहिले. त्यामुळे तातडीने सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला, अशी सकारात्मक प्रतिक्रिया काहींची होती. आम्ही आधीच भूकंपाने खचलोय, त्यात तुमच्यामुळे त्रासलो आहोत, तुमचा प्रसारमाध्यमांचा 'भूकंप' आता थांबवा!, असे एकाने ट्विट केले आहे.