Sunday 10 May 2015

पत्रकार संघाची फसवणूक करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल

ठाणे येथील गावदेवी मैदानाजवळील सरकारी भूखंडावर उभारलेले पत्रकार भवन गेल्या २२ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून त्याच्या पुनर्विकासाच्या नावाखाली पत्रकार, इतर विकासक आणि सरकारची घोर फसवणूक करणारा ठेकेदार राजन शर्मा व त्याचा भाऊ यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारण्यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाला १९८८ मध्ये सरकारने गावदेवी मैदानाजवळ भूखंड दिला. पत्रकार संघाशी करार करून ठेकेदार राजन शर्मा याने पत्रकार भवनाचे काम घेतले. भवनाचे काम पूर्ण होऊन पत्रकार संघाला त्यांच्या हक्काची जागा देण्याऐवजी गाळे, हॉलची परस्पर विक्री केली. यासंदर्भात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांपासून आवाज उठवून ठेकेदारावर कारवाईसाठी सरकारी स्तरावर पाठपुरावा सुरू केला.महसूल विभाग, पोलीस आणि महापालिकेकडे पत्रकारांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईसाठी संघाने तगादा लावला असता अनेक प्रकरणे समोर आली. त्यातून ठेकेदार शर्मा याने पत्रकार भवनाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली ठाण्यातील दोन बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक करून १ कोटी २ लाख ९५ हजारांचा अपहार केला. 

याप्रकरणी महसूल विभागासह पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने अध्यक्ष संजय पितळे व पत्रकार संघावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. अखेर दूध का दूध पाणी का पाणी होऊन शर्मा बंधूंचे पितळ उघडे पडले. सातत्याने फसवणुकीने हैराण झालेल्या अनिल सिंग यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ठेकेदार शर्मा याच्यावर फसवणूक आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. हा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच फसवणूक झालेल्या काही लोकांनी पोलिसांकडे धाव घेण्यात सुरुवात केली असून त्यातून आणखी मोठा घोटाळा बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ७0 लाखांची फसवणूक झालेल्या अरविंद पटेल यांच्या तक्रारीनुसार दुसरा गुन्हा लवकरच दाखल करू, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी दिली.