Wednesday 1 July 2015

दै.गांवकरीच्या कर्मचार्‍यांचे वेतन न मिळाल्याने लेखणी बंद आंदोलन

औरंगाबाद येथील दै.गांवकरीच्या कर्मचार्‍यांचे मागील काही वर्षांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करत कामगार उपायुक्तांना निवेदन दिले. 

प्रति,
मा.कामगार उपायुक्त,
कामगार उपायुक्त कार्यालय,
औरंगाबाद
विषय : कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाबाबत. 

महोदय,
उपरोक्त विषयी आपणास आम्ही दै.गांवकरीचे सर्व कर्मचारी विनंती करतो, की औरंगाबाद कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचे जवळपास सर्वांचेच 12 महिन्याचे वेतन थकलेले आहे. यासंदर्भात दै.गांवकरीचे मुख्य संपादक व मालक मा.वंदनराव पोतनीस, नाशिक यांच्याशी दि. 30 मे 2015, दि. 6 जून 2015 व 25 जून 2015 रोजी लेखी पत्र देऊन वेतन मिळण्यासंदर्भात विनंती केली. परंतु औरंगाबाद कार्यालयातील व्यवस्थापनाकडून व मा.वंदनराव पोतनिसांकडून आम्हाला वेतन मिळाले नाही.
मा.वंदनराव पोतनीस यांच्याशी दि. 6 जून 2015 रोजी औरंगाबाद येथील दै.गांवकरीच्या कार्यालयात समक्ष भेट घेऊन वेतन मिळाण्या बाबतचे निवेदन देऊन वेतन मिळण्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी तोंडी आश्‍वासन दिले होते की, येत्या 10 ते 12 जून 2015 पर्यंत एका महिन्याचे पूर्ण वेतन आणि नंतर 25 ते 28 जून 2015 तारखेपर्यंत एका महिन्याचे असे दोन महिन्याचे वेतन आम्हा सर्व कर्मचार्‍यांना जून महिन्यात देणार असे कबूल केले होते. त्यानुसार आम्ही दि. 25 जून 2015 पर्यंत वेतन मिळण्याची वाट बघीतली. व दि. 25 जूनला तिसरे निवेदन त्यांना पाठवले. पण आम्हाला अजूनपर्यंत एकाही महिन्याचे वेतन मिळालेले नाही. या संदर्भात कृपया आम्हाला सहकार्य करावे.

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक गांवकरीचे नित्यनियमाप्रमाणे काम करीत आहोत. व्यवस्थापनाकडून कर्मचार्‍यांना कोणत्याही सोयी, सुविधा मिळत नाहीत. (ईएसआयएस, भविष्य निर्वानिधीची सोय नाही) किमान वेतन कायद्याचा अंमलही केला जात नाही. कर्मचार्‍यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. वेतनवाढ तर नाहीच परंतु कर्मचार्‍यांना ठरावीक वेतनही मिळत नाही.
कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. व आमच्या पाल्यांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यांना वह्या-पुस्तके, जाण्यायेण्याची सोय, शाळेचे कपडे व इतर शालेय साहित्य आम्ही अजूनपर्यंत त्यांना घेवून देऊ शकलो नाहीत. त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍नही आमच्यापुढे गंभीर झाला आहे. वेळोवेळी आम्हाला मालकाकडून तोंडी आश्‍वासन दिले गेले. पण एकदाही ते आश्‍वासन पाळले गेले नाही. ही आमची सफसेल फसवणूक असून त्यासंदर्भात आम्हाला शक्य तेवढ्या लवकर वेतन मिळवून देण्यासंदर्भात सहकार्य करावे. या निवेदनाद्वारे आपणास उपोषणाचा इशारा आम्ही सर्व कर्मचारी देत आहोत. तरी मा.कामगार उपायुक्त साहेबांनी आम्हाला आमच्या हक्कासंदर्भात न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती.
दि. 29 जून 2015