Wednesday 1 July 2015

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान

मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा यंदाचा कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार 'लोकमत'चे संपादक राजाभाऊ माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दै. 'प्रहार'चे शैलेंद्र शिर्के, 'सकाळ'चे ज्ञानेश चव्हाण, 'एबीपी माझा'चे विलास बढे, सचिन देसाई यांना पत्रकार भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, शंकरराव रहाणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. अशोक नायगावकर यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने अत्यंत खुमासदार व्यंगात्मक काव्य सादर करून वातावरण प्रसन्न केले, तर येणार्‍या काळात ग्रामीण पत्रकारितेला अधिक जागरुक राहून काम करावे लागेल.

अंधारातील मशालीची भूमिका यानंतर ग्रामीण पत्रकारांना निभावावी लागेल, असे भारतकुमार राऊत यांनी सांगितले. या वेळी शरद देसाई (पुढारी-राजापूर), सचिन देसाई (एबीपी माझा, रत्नागिरी), नामदेवराव क्षीरसागर (संपादक, चंपावती पत्र, बीड), दिलीप देवळेकर (रत्नागिरी टाइम्स खेड), व्यंगचित्रकार अवी जाधव, गंगाधर शिंदे (पुण्यनगरी, संगमनेर) यांचाही सन्मान करण्यात आला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अरविंद तथा अण्णासाहेब म्हस्के (अंबरनाथ) यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे शशांक कदम, सचिन चव्हाण-खेड (उद्योगश्री पुरस्कार), ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती, उल्हासनगरचे नगरसेवक विजय पाटील, रामचंद्र आखाडे, नितीन डेरवणकर, दिलीपकुमार इंगवले, दीपिकाताई चिपळूणकर (समाजभूषण पुरस्कार) यांचाही सन्मान करण्यात आला.