Sunday 12 July 2015

"मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" जर्नलिस्ट्स युनियनच्या ताब्यात

विविध शासकीय कार्यालयात प्रथा परंपरेनुसार संबंधीत बिटचे वृत्तसंकलन कारणाऱ्या पत्रकारांचे वार्ताहर संघ चालतात. असे प्रथा परंपरे नुसार चालू असलेल्या वार्ताहर संघाची नोंदणीच करता येत नाही असे सांगितले जात होते. नोंदणीकृत नसलेले वार्ताहर संघ चालवून काही मोजक्या पत्रकारांचा स्वार्थ जपला जात होता. अशी परस्थिती सर्वच शासकीय कार्यालयातील पत्रकार संघटनांची असताना "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" या संघटनेने मंत्रालय आणि विधीमंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांची संघटना असलेल्या "मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" या पत्रकार संघटनेची नोंदणी करून हि संघटनाच आपल्या ताब्यात घेतली आहे.
   
"जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" हि कामगार कायद्याखाली नोंद असलेली पत्रकार संघटना गेले कित्तेक वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. पत्रकारांच्या विविध विषयांवर आणि समस्यांवर ट्रेड युनियन म्हणून काम करणाऱ्या "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र"ने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि शासकीय कार्यालयात आपले युनिट स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगर पालिकेमध्ये प्रथा परंपरेनुसार चालवण्यात येणाऱ्या वार्ताहर संघाला समांतर असा "मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" स्थापन करून भारताच्या आर्थिक राजधानीत आपले युनिट स्थापन केले आहे. मुंबई महानगर पालिकेत समांतर पत्रकार संघ स्थापन करून "जर्नलिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्र" थांबलेली नाही. महाराष्ट्र राज्याचा कारभार हाकल्या जाणाऱ्या मंत्रालयातील पत्रकार संघावर युनियने कब्जा केला आहे. युनियनने "मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" याच नावाने मंत्रालय आणि विधीमंडळात आपले युनिट स्थापन केले आहे. युनियने मंत्रालयात आपले नुसते युनिट स्थापन केले नसून "मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" या नावाची संघटनाच धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करून घेतली आहे.

"मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ" हि संघटना आता नोंदणीकृत झाली असल्याने या नावाचा वापर आता कोणालाही करता येणार नाही. नोंदणीकृत नावाचा वापर केल्यास अनेकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने अनेक प्रस्थापित पत्रकारांची गोची होणार आहे. वार्ताहर संघाची नोंदणी करताना हि संघटना युनियनशी संलग्न करून घेण्यात आली आहे. गेले अनेक वर्ष अधिस्वीकृतीधारक, साप्ताहिक, विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या, वेब मिडिया यासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना प्रस्थापित वार्ताहर संघाचे सभासद होता येत नव्हते. आता युनियनने वार्ताहर संघ नोंदणीकृत करताना मंत्रालयात येणाऱ्या अधिस्वीकृतीधारक, साप्ताहिकांचे पत्रकार, विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या, वेब मिडिया यासाठी काम करणाऱ्या सर्वच पत्रकारांना त्वरित सभासदत्व मिळेल याची सोय करून ठेवली आहे. वार्ताहर संघ नोंदणीकृत करून घेतल्याने प्रथा परंपरेने चालवलेला वार्ताहर संघ ताब्यातून गेल्याचे दुख: होऊन काही पत्रकारांची झोप उडाली असताना मंत्रालयातील सर्वच पत्रकारांना सदस्य करून घेतले जाणार असल्याने बहुसंख्य पत्रकारांनी वार्ताहर संघ नोंदणी केल्याचे स्वागत केले आहे.