Tuesday 11 August 2015

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा सरकारच्या विचाराधीन - माधव भंडारी

पुणे : राज्यातील पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात सरकार विचाराधीन असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलले असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे दिली.

खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या ९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा आणि ग्रामस्थांचा खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माधव भंडारी म्हणाले, सामाजिकतेचे भान ठेवून खेड तालुका मराठी पत्रकार संघाने या वेळच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचा केलेला सन्मान समाजापुढे आदर्श ठेवणारा उपक्रम आहे, अशी प्रशंसा करत राज्यातील हा पहिलाच कार्यक्रम येथील पत्रकारांनी यशस्वी केला. हा राजकीय नेत्यांना आणि शासनाला दिशादर्शक ठरणारा उपक्रम बनला आहे. शासकीय पातळीवर असे कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुका सामंजस्याने बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. या इच्छुक सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि एकमताने गावकारभारी निवडले हा त्यांच्या मोठा सन्मान आहे. गावकाराभारात एकमेकांवरील विश्‍वास महत्त्वाचा असतो. सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.