Friday 9 October 2015

अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती प्रक्रिया सुसूत्रीकरणाबाबत प्रसाद काथे यांचे पत्र

अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती प्रक्रिया सुसूत्रीकरणाबाबत समितीचे सदस्य प्रसाद काथे यांनी एक पत्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांना दिले आहे. हे पत्र "बेरक्या मिडिया न्यूज" पोर्टलच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. 

दिनांक - ०६ ऑक्टोबर २०१५
प्रति,
श्री. यदुनाथ जोशी,
सन्माननीय अध्यक्ष,
राज्य अधिस्वीकृती समिती २०१५ - २०१८
महाराष्ट्र राज्य

विषय - अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती प्रक्रिया सुसूत्रीकरणाबाबत,

मा. महोदय,
उपरोल्लेखित विषयाला अनुसरून मी आपणासमोर माझे निवेदन मांडत आहे.
आपण जाणताच की, अधिस्वीकृती पत्रिका मिळवण्यासाठीची सध्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि क्लिष्ट बनली असल्याने अर्जदार पत्रकाराला अनेक दिव्यातून जावे लागते. त्यामुळे, सरकारी व्यवस्थेबाबत अनास्था निर्माण होत आहे. सदर स्थिती तातडीने बदलण्याची गरज असून त्यायोगे व्यवस्था सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकता येईल. यासाठी माझ्या सूचना पुढीलप्रमाणे,
१) अधिस्वीकृती पत्रिका अर्जदाराचा अर्ज ६० कार्यालयीन दिवसात निकाली निघावा.
२) अर्ज अंतिम पातळीवर मंजूर झाल्यानंतरच्या २० कार्यालयीन दिवसात अर्जदाराला अधिस्वीकृती पत्रिका हाती मिळावी.
३) गहाळ अधिस्वीकृती पत्रिका पुनर्प्राप्ती योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतरच्या ३० कार्यालयीन दिवसात व्हावी.
४) प्रत्येक अधिस्वीकृती धारकाची त्याच्या पहिल्या अर्जापासून स्वतंत्र कीर्द (फाइल) असावी. या फाइलमध्ये अर्जदाराचे वेळोवेळीचे कागदपत्र जोडले जावेत. जेणेकरून नोकरी बदलल्यास नूतन अधिस्वीकृती पत्रिका मिळवण्यासाठी अर्जदारास पुन्हा सर्व कागदपत्रे नव्याने द्यावी लागणार नाहीत. नव्या नोकरीच्या संबंधातील कागदपत्रे जोडून केलेला अर्ज पुरेसा समजावा. यामुळे, सरकार दरबारी कागदांचे भेंडोळे कमी होतील व सरकारलाही प्रत्येक अर्जदाराची अथपासून इतिपर्यंतची माहिती एका फाईलमध्ये मिळू शकेल.
५) अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी अत्यावश्यक असे पोलिस प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबत धोरण सुस्पष्ट असावे व त्याची पद्धत छापिल स्वरुपात अर्जासोबतच अर्जदाराला द्यावी. यामुळे, सदर प्रमाणपत्र मिळण्याचा होणारा प्रवास अर्जदाराला कळेलच शिवाय अर्जदार आपल्यापरिने त्याचा पाठपुरावा करेल. हा पुढाकार एकूणच प्रक्रियेला गती देणारा ठरेल असा विश्वास वाटतो.
६) अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती अर्ज ऑनलाइन असावा.
७) अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती अर्ज ऑनलाइन भरता यावा.
८) अधिस्वीकृती पत्रिका प्राप्ती अर्ज व पत्रिकेचे शुल्क ऑनलाइन भरता यावे.
९) राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अधिस्वीकृती पत्रिका धारक व अर्जदार यांची सद्यस्थिती सांगणारा तपशील सार्वजनिक करावा. यात विद्यमान धारकाचे नाव, प्रकाशन / दूरचित्रवाणी संस्था, अधिस्वीकृती पत्रिका क्रमांक, अधिस्वीकृती पत्रिका वैध असल्याचा कालावधी यासह अर्जदाराचे नाव, अर्ज केल्याची तारीख, अर्ज मंजूर / नामंजूर झाल्याची तारिख, शेरा व कारण असावे.
१०) राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशन संस्था व दूरचित्रवाणी संस्था यांना नेमून दिलेला अधिस्वीकृती पत्रिकांचा कोटा व त्यातील रिक्त पदे याची माहिती सार्वजनिक करावी.

महोदय,
आपल्या अध्यक्षतेखालील या समितीकडून अधिस्वीकृती पत्रिकाधारक व इच्छुक पत्रकारांच्या हितरक्षणाच्या दृष्टीने सर्वंकष निर्णय होणे अपेक्षित आहे. त्याला अनुसरून केलेल्या उपरोल्लेखित सूचना आपण पुणे येथे ८ व ९ ऑक्टोबर २०१५ रोजी होणा-या आगामी बैठकीत स्वीकाराल अशी नम्र अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो.
कळावे,
आपला,

प्रसाद काथे,
सदस्य,
राज्य अधिस्वीकृती समिती २०१५ - २०१८
महाराष्ट्र राज्य

प्रत माहितीसाठी रवाना,
सन्माननीय महासंचालक,
माहिती व जनसंपर्क संचालनालय,
महाराष्ट्र राज्य