Monday 12 October 2015

पोलीस निरीक्षकाकडून पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी

मावळातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्‌याच्या बातम्या सतत प्रसिध्द करणा-या तसेच कामशेतसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मीतीसाठी सतत पाठपुरावा करणा-या पत्रकारांना वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस हवालदार बाबा शिंदे यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मावळ पत्रकार संघातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, कामशेत येथील स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मीतीसाठी मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दै.सकाळचे विजय सुराणा,दै.लोकमतचे महादेव वाघमारे,दै.पुढारीचे किशोर ढोरे  या पत्रकारांनी वृत्तपत्रातुन सातत्याने पाठपुरावा केला. परंतु कामशेत पोलीस ठाणे होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस हवालदार बाबा शिंदे यांनी खुप प्रयत्न केले. सदरची पोलीस ठाणे अस्तित्वात येउन उद्घाटन झाल्यानंतर वरील तीन पत्राकारांबद्दल त्यांनी आकस धरला.

मावळ येथील किसन परदेशी गोळीबार प्रकरण हेच पोलीस आणि डॉक्टर दडपण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती मिळाल्यानंतर वरील पत्रकारांनी हे प्रकरण उघडकीस आणले आणि एक मोठा अपराधी पोलिसांच्या तावडीत सापडला. यामुळे चिडलेल्या पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस हवालदार बाबा शिंदे यांनी विजय सुराणा, महादेव वाघमारे, किशोर ढोरे यांना काही पत्रकारांसमोर गोळ्या घालुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने वरील तीनही पत्रकारांचे कुटुंबिय घाबरले आहेत.

पोलीस निरीक्षक विजय जाधव व पोलीस हवालदार बाबा शिंदे यांचे गुन्हेगारांसोबत संबंध असुन त्यांच्यापासुन आमच्या जिवाला धोका आहे. तसेच आमचे काही बरेवाइट झाल्यास याला जबाबदार वरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असतील असे वरील पत्रकारांनी सांगीतले. या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून वर नमुद केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पत्रकार संघाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येइल असे  मावळ पत्रकार संघातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.