Sunday 19 January 2014

पत्रकारांनी देश चालवण्याचा आव आणू नये - ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र

आपण देश, समाज चालवतो अशी मिजास पत्रकारांनी ठेऊ नये आपण समाजाचे सफाई कामगार आहोत. घाण दिसल्यावर चांगली बातमी मिळाल्यांचा आनंद न ठेवता काम चोखपणे करावे आपल्याला हात लावताना लोकांनी हजारदा विचार करावा अशी कामगिरी करुन पत्रकारांना कोणीही हात लावणार नाही या अर्थाने अस्पृश्य राहिले पाहिजे. मालकांच्या वृत्तीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होण्याचा धोका आहे, असे सडेतोड प्रतिपादन टाईम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी मंत्रालय येथे केले. 

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभात मिश्र बोलत होते. या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अबंरिश मिश्र यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते विधान भवनात प्रदान करण्यात आला. यावेळी वार्ताहर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, कार्यवाह मंदार पारकर उपस्थित होते. 
अंबरीश मिश्र यांनी गेली चौतीस वर्षे उत्कृष्ट पत्रकारिता करतानाच साहित्याचीही सेवा केली. शुभ्र काही जीवघेणे, अलख आदि त्यांची पुसत्के रसिक मान्य झाली आहेत आपल्या चिंतनपर भाषणात मिश्र म्हणाले की अनेक ज्येष्ठ पत्रकारांपासून प्रेरणा घेत आपण पुढे जात असतो. जुन्या काळात आणि आत्ताच्या काळात बराच फरक पडलेला जाणवतो. मात्र त्या काळातही मंत्र्यांचे चांगून चालन करणारे पत्रकार होते तसेच सडेतोड भूमिका घेणारेही पत्रकार होते. मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की पत्रकार म्हणून मला जे पैसे मिळाले आणि लेखनाचे जे पैसे मिळाले त्यातच मी माझ्या गरजा भागवल्या. अधिकाची हाव केली नाही. 
मराठी वृत्त वाहिन्यांनी मराठी भाषेची अधिक काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच मिश्र म्हणाले की आपण आपल्या भाषेचा बाज जपूनच टीव्हीवरून भाष्य केले पाहिजे. अनेक चॅनेलतर्फे अनेक पुरस्काराचे भव्य कार्यक्रम होतात त्यावेळी भरपूर जाहिरातीतून उत्पन्नही मिळत असेल. त्यातील दहा टक्के रक्कम या चॅनेलनी मराठी भाषेच्या विकासाठी ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
सकारात्मक पत्रकारिता नेत्यांना आणि समाजाला सुध्दा प्रेरणा देते त्यामुळे पत्रकारिता बिनचूक आणि सकारात्मक व्हावी अशी अपेक्षा नामदार टोपे यांनी व्यक्त केली. पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न सरकारने सोडवावा असी अपेक्षा असेल तर पत्रकारांनीही थोडा जोर लावावा या काळात ( निवडणुकांच्या काळात) अशा मागण्या होऊ शकतात अशीही टिप्पणी टोपे यांनी केली. पत्रकारांच्या पेन्शन बाबतच्या मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर मी नक्की घालेन असे आश्वासन टोपे यांनी दिले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी केले. मंदार पारकर यांनी परिचय, पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी निवड समितीचे सदस्य उदय तानपाठक, सुरेंद्र गांगण, तसेच मानपत्र लिहिणा-या मृणालिनी नानिवडेकर यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन मनिषा रेगे यांनी केले.