Sunday 19 January 2014

मनसे गटनेत्यावर पालिकेतील पत्रकारांचा बहिष्कार

मुंबई महानगर पालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्याने गटनेते बनलेले संदीप देशपांडे यांच्याकडून काही खास वृत्तवाहिन्यांचे व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांनाच सतत बातम्या दिल्या जात असल्याने इतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना देशपांडेच्या बातम्या का मिळत नाहीत अशी सतत कार्यालयातून विचारणा होत आहे. यामुळे कित्तेक पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगर पालिकेमध्ये चमकेश नगरसेवक अशी संदीप देशपांडे यांची ओळख आहे. देशपांडे यांनी पत्रकारांना विशेष करून वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना हाताशी धरून आंदोलन करून भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. देशपांडे यांना मोठे करण्यात पत्रकारांचा मोठा रोल आहे. नेहमी पत्रकारांच्या घोळक्या सोबत राहणाऱ्या देशपांडे यांनी पालिकेतील मनसेचे गटनेते पद मिळताच दोन वृत्तवाहिन्या आणि दोन इंग्रजी वृत्तपत्रांनाच बातम्या देण्यास सुरु केले आहे. 

यामुळे इतर पत्रकारांना देशपांडेंच्या बातम्या का मिळत नाही असा प्रश्न सातत्याने कार्यालयामधून विचारला जात असल्याने कित्तेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांचे पत्रकार त्रस्त झाले आहेत.देशपांडे यांना जर दोन वृत्तवाहिन्या आणि दोन इंग्रजी वृत्तपत्रांनाच बातम्या द्यायच्या असतील तर मग इतर पत्रकारांनी देशपांडेंच्या बातम्या का दाखवाव्यात, छापाव्यात असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला जात आहे. 

गटनेते पदावर असताना मनसेचे संदीप देशपांडे पत्रकारांमध्ये भेदभाव निर्माण करत असल्याने पालिकेमधील पत्रकारांमध्ये देशपांडे यांच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला असून देशपांडे यांच्यावर पत्रकारांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. असाच बहिष्कार पालिकेतील पत्रकारांनी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर - पाटणकर यांच्यावर सुद्धा घातला होता. परंतू त्यावेळी काही मोजके पत्रकार बहिष्कार असतानाही लपून छपून मनीषा म्हैसकर यांच्याकडे जाऊन वृत्तसंकलन करत होते. यामुळे पत्रकारांमध्ये एकता नसल्याचे समोर आले होते. आता देशपांडे यांच्या निमित्ताने पुन्हा बहिष्काराचे अस्त्र पत्रकारांनी उचलले आहे. यावेळी तरी सर्व पत्रकार एकी दाखवतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.