Tuesday 21 January 2014

ज्येष्ठ पत्रकार डायस यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक फ्लाजीयान डायस यांचे रविवारी गोवा येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व अन्य कुटुंबीय आहेत. डायस यांनी ४0 वर्षांहून अधिक वर्षे पत्रकारिता केली. मुंबईमध्ये 'फ्री प्रेस र्जनल'मधून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. त्या दरम्यान ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्यही होते. 


त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे गोवा सर्कल ब्युरो चिफ म्हणून सुमारे २0 वर्षे काम पाहिले. नवृत्तीनंतर त्यांनी 'गोवा पोस्ट' या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे ते सरचिटणीस होते. गोव्यातील पत्रकारांचे वेतन व सुविधा यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. तसेच त्यांनी गोव्यात पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले. समाजवादी नेते पीटर अल्वारिस व मधू लिमये यांचे मित्र असलेले डायस यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांना पेन्शन वाढवून मिळण्यासाठीही प्रयत्न केले व ते पूर्णत्वास नेले. मुंबईत असताना गोमान्तक आझाद दल या संघटनेसाठी ते कार्यरत होते.