Tuesday 7 January 2014

पत्रकारांनी सकारात्मक आणि प्रेरणादायी लेखन करावे- राजेश टोपे

जालना : पत्रकार आपल्या लेखानातून समाजावर चांगला परिणाम करु शकतो. तेव्हा पत्रकारांनी समाजकारण, राजकारण आणि विकास कामांना प्रसिद्धीचे विषय बनवून सकारात्मक आणि प्रेरणादायी लेखन केल्यास इतरांना त्यातून प्रेरणा मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च वतंत्र शिक्षण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. 


जालना जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे सोमवारी आयोजित दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आणि पत्रकार गौरव सोहळ्यात ते बोलत होते. येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार कैलास गौरंट्याल हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परतूरचे आमदार सुरेशकुमार जेथलिया, बदनापूरचे आमदार संतोष सांबरे, जि.प.च्या अध्यक्षा अशाताई भुतेकर, माजी आमदार विलास खरात, जालनाच्या नगराध्यक्षा पद्माताई भरतीया, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हफीज, पंडितराव भुतेकर आदी उपस्थित होते. 

सर्वच क्षेत्रांच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे. पत्रकारांचे काम समाज आणि देश घडवण्याचे आहे. हे काम असेच आपल्या हातून घडत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन टोपे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज जागृती आणि सामाजिक सुधारणाचे काम केले. ते काम आजही करण्याची गरज आहे. समाजात लोकशाही रुजवण्याचे, लोकशाहीला पुरक समाज मन घडविण्याचे, लोकशिक्षण करण्याचे, लोकांना प्रेरणा देण्याचे काम करण्याबरोबरच पत्रकारांनी लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरील असलेली जबाबदारी पार पाडावयाची आहे. समृद्ध समाज घडवावयाचा आहे, असेही ते म्हणाले. 

समाजात सकारात्मकता निर्माण व्हावी, नकारात्मकता, समाजात द्वेष निर्माण करणारे, समाजमन बिघडवणाऱ्या विचारांना महत्व प्राप्त होणार नाही, याची पत्रकारांनी काळजी घ्यावी, असे सांगून टोपे म्हणाले की, पत्रकारांवरील हल्ला संदर्भात कायदा करण्यासाठी राज्याचे उद्योग विकास मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल प्राप्त होताच राज्य शासन पुढील कार्यवाही करेल. पत्रकारांना अडचणीच्या वेळी, आजारांच्या काळात मदत व्हावी म्हणून शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची स्थापना राज्य शासनाने केली असून त्याव्दारे पत्रकारांना भरीव मदत करण्यात येत आहे. त्याचा पत्रकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

माध्यमे ही लोक प्रतिनिधींसाठी माहितीचे महत्वाचे स्तोत्र आहे. पत्रकारांमुळे लोकशाही बळकट होण्यास मदत झाली आहे. मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवर लोकप्रतिनिधी बरोबरच पत्रकारांनीही योग्य भूमिका घेतल्याने काही प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. जायकवाडीचे पाणी प्रश्न हे अलिकडचे ताजे उदाहरण आहे, असे सांगून आमदार सांबरे म्हणाले. जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी, समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी पत्रकारिता करावी, असे आवाहन विलास खरात यांनी केले. विकास कामात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहत आली असून ही भूमिका पत्रकारांनी कायम ठेवावी, असे मत आमदार जेथलिया यांनी व्यक्त केले. 

जालन्याच्या पाणी प्रश्नासाठी पत्रकारांनी अत्यंत महत्वाची भूमिका मांडून आमच्या कामाला पाठींबा दिला. हा प्रश्न लावून धरला त्यामुळे जालना शहरातील जायकवाडी धरणातून थेट पाईपलनाईनव्दारे पाणी मिळू शकले, असे मत आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केले. जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अघ्यक्ष अब्दुल हफिज यांनी केले. त्यांनी पत्रकार संघाच्या विविध कामांची माहिती देऊन पत्रकारांचे प्रश्न यावेळी मांडले. यावेळी पत्रकार संघातर्फे जिल्हयातील दैनिक वृत्तपत्रांच्या संपादकांचा, ज्येष्ठ पत्रकारांचा, दैनिकांच्या जिल्हा प्रतिनिधींचा, जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा, छायाचित्रकारांचा सत्कार पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर दुपारी पत्रकार भवनातील सांस्कृतिक भवनास दिवंगत पत्रकार सतीश सुदामे यांचे तर दिवंगत पत्रकार दिगंबर शिंदे यांचे पत्रकार भवन मार्गास नाव देण्याच्या नामकरण फलकाचे अनावरण आमदार गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आले. आभार विजय सकलेचा यांनी मानले.