Friday 21 March 2014

ज्येष्ठ पत्रकार खुशवंत सिंग यांचे निधन



नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले पत्रकार-लेखक खुशवंत सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. वृद्धापकाळामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या खुशवंत सिंग यांनी राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. 
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील हदालीमध्ये २ फेब्रुवारी १९१५ साली जन्मलेले खुशवंत सिंग आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जायचे. 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या साप्ताहिकासह 'नॅशनल हेराल्ड' आणि 'हिंदुस्तान टाइम्स'च्या संपादकपदाची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. त्यांनी लिहिलेली 'ट्रेन टू पाकिस्तान', 'आय श्ॉल नॉट हियर द नायटिंगल' आणि 'डेल्ही' ही पुस्तके प्रचंड गाजली. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी 'द सनसेट क्लब' ही कादंबरी लिहिली होती. लेखक-संपादक म्हणून नाव कमावणार्‍या खुशवंत सिंगांना १९७४ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र १९८४ साली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सरकारने केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध करत त्यांनी या पुरस्कार परत केला होता. 

त्यानंतर २00७ साली त्यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने १९८0 साली त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. सिंग यांनी १९४७ सालापासून पुढील काही वर्षे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातही सेवा बजावली होती. या चतुरस्र लेखकाच्या निधनावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह राजकारण, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरही त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. भारतासह पाकिस्तानमध्येही लोकप्रिय असलेल्या या लेखकाचे 'बाई, बाटली आणि इतिहासा'वरील लेखन तुफान गाजले. वयाच्या ९९ वर्षी खुशवंत सिंग यांची प्राणज्योत राहत्या घरी मावळली. दिल्लीतील लोधी रोडवरील स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.