Friday 21 March 2014

शक्ती मिल प्रकरणांत आज शिक्षा सुनावणार



मुंबई : शक्ती मिलमध्ये इंग्रजी मासिकातील छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाच नराधमांना सत्र न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. या दोषींना न्यायालय आज (शुक्रवारी) शिक्षा सुनावणार आहे. 



२२ ऑगस्ट रोजी एका इंग्रजी मासिकातील छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक अत्याचाराचे निंदनीय कृत्य घडले. ही घटना उजेडात येताच ३१ जुलै रोजी याच मिलच्या आवारात टेलिफोन ऑपरेटरवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेला वाचा फुटली. या दोन्ही घटनांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यात दोन अल्पवयीन होते तर तीन आरोपींचा दोन्ही प्रकरणांत सहभाग असल्याचे उघडकीस आले. 

त्यामुळे दोन्ही घटनांच्या खटल्यावर प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी यांच्यासमोर एकत्रित सुनावणी झाली. न्यायालयाने विजय जाधव (१९), मोहम्मद कासिम शेख (२१) आणि मोहम्मद अन्सारी(२८) यांना दोन्ही घटनांतील सहभागाच्या आरोपावरून दोषी ठरवले. या तीन नराधमांबरोबरच छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचारप्रकरणी सिराज खान आणि टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील अत्याचारप्रकरणी अशफाक शेख यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणांतील दोघा अल्पवयीन आरोपींविरोधात बालगुन्हेगारी न्यायालयात स्वतंत्ररीत्या खटला चालणार आहे.

सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच आरोपींना सामूहिक अत्याचार, कट रचणे, सामूहिक हेतू, अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी सरकारी पक्षाने ४४ साक्षीदार तपासले तर टेलिफोन ऑपरेटरवरील अत्याचार प्रकरणात ३१ साक्षीदारांनी साक्ष नोंदवली. बचाव पक्षाने छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचार प्रकरणात तीन साक्षीदार तर दुसर्‍या प्रकरणात केवळ १ साक्षीदार तपासला. पोलिसांनी छायाचित्रकार तरुणीवरील अत्याचार प्रकरणात गतवर्षी १९ सप्टेंबर रोजी ६00 पानी तर टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील अत्याचार प्रकरणात ३६२ पानी आरोपपत्र दाखल केले.