Saturday 8 March 2014

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलतीच्या दरात बेस्ट बसपास

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलतीच्या दरातील बसपास देण्याचे आश्‍वासन शिवसेना-भाजपा- युतीने मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते त्यानुसार अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना बेस्टच्या सवलतीच्या दरातील बसपास योजनेचा शुभारंभ नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

मुंबईतल्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलतीच्या दरातील बेस्ट बसपास देण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय (नाना) आंबोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हे काम प्राधान्याने हाती घेतले. याबाबतचे कागदोपत्रीचे सर्व सोपस्कार पूर्ण करून त्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी नुकताच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांना बसपास देण्यात आले. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसोबतच स्वातंत्र्य सैनिकांना देखील मोफत बसपास या वेळी देण्यात आले.