Thursday 2 April 2015

जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीला जय महाराष्ट्र करताना कार्यकारी संपादक शैलेश लांबे यांनी सहकाऱ्याना लिहिलेले निरोपाचे भावनीक पत्र .......

निरोपाचं पत्र
माझ्या सहकाऱ्यांनो,
गेल्या १६ महिन्यांपासून मी तुमच्यासोबत काम करतोय. एका राष्ट्रीय वाहिनीचा अनुभव गाठीशी घेऊन मी मराठीमध्ये आलो होतो ते काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी. मी माझ्या परीने प्रयत्न केले. थोडीशी आक्रमकता आणून वेग वाढवण्यासंदर्भात काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत अनेकांची मनं दुखावली. पण चॅनलचं भवितव्य आणि चॅनलची प्रतिमा उंचावण्यासाठी मी हे प्रयोग केले होते. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मुळात बोटावर मोजण्याईतक्याच व्यक्तींना मी ईथे ओळखत होतो. मराठी चॅनल्सच्या लिस्टमध्ये आपण समाधानकारक स्थान मिळवावं अशी माझी ईच्छा होती.

आपण ईतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे बनवण्याचा प्रयत्न केला. पण ही प्रक्रिया अर्धवट टाकून मला पुढे जावं लागतंय हे अत्यंत खेदानी सांगावं लागतंय. आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही मला अत्यंत मोलाची साथ दिली त्याबद्दल आपले आभार ...  तुम्ही सगळे सूजाण आहात, सूज्ञ आहात. आयुष्यात आपण काय केलं पाहिजे आणि आपल्या करिअरचा प्रवास कसा असणार आहे आहे यासंदर्भात तुमचे काही ठोकताळे नक्कीच असतील. जर मराठी मिडीया जिवंत राहिला तरच तुमची स्वप्न पूर्ण होतील. आता नवीन नवीन प्लॅटफॉर्मवर चॅनल उपलब्ध होणार आहे. त्याबाबतची आव्हानं आपल्याला पेलावी लागतील.

मुळात मराठी माध्यमात पाचंच वाहिन्या का कार्यरत आहेत, याचा विचार झालाय का ? गेल्या दीड वर्षापासून मी टीआरपीचा अभ्यास करतोय. तुमच्यापैकी कोणी केलाय का ? पहिल्या क्रमांकावरच्या चॅनलला मागे टाकून पुढे जावं आणि बाजारपेठेतला हिस्सा अर्ध्याच्या वर काबिज करावा अशी महत्त्वाकांक्षा ईतर वाहिन्यांमध्ये दिसलीच नाही. बाजारपेठेत स्पर्धाच ठेवली नाही तर बाजारपेठेचा आकार कसा वाढणार ? बाजारपेठेचा आकार वाढला नाही तर व्यवसाय कसा वाढणार ? स्पर्धात्मकताच नसेल तर बाजारपेठेचा आकार कसा वाढणार ? व्यवसाय वाढला नाही तर मराठी वृत्त वाहिन्यांच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा होणार ?  अहो, आपण ज्या क्षेत्रात नोकरी करतो त्या क्षेत्राची अर्थव्यवस्थेतली सद्यस्थिती काय आहे याचा विचार केला नाही तर आपल्या करिअरची दिशा आणि दशा कशी समजणार ?  मी गेल्या 16 महिन्यांपासून हेच समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मराठी न्यूज चॅनलचं अर्थशास्त्र हे समजून घ्यायलाच हवं ... त्याशिवाय आपल्याला पुढची दिशा ठरवता येणार नाही .... महत्त्वाकांक्षा आणि स्वाभिमान यांची सांगड ज्याला घालता आली तोच करिअरमध्ये पुढे गेला आहे. मी आजही म्हणतो, ज्याला उद्या काय होणार आहे हे समजतं, त्याला बुध्दीवादी म्हणतात. .. संपादक काय म्हणाले, बातमी मिस झाली तर काय होतं, रनडाऊन किती फ्रेश आहे आणि किती रिपीट आहे, पाट्या किती टाकल्या आणि कलात्मक पध्दतीचं काम किती केलं .... या सगळ्या प्रश्नांची उत्तर घरी गेल्यानंतर जर शोधली तर तुमच्या लक्षात येईल की मराठी भाषेवर प्रेम आहे असा दावा करणारे लोकं मराठी भाषेतल्या वृत्त वाहिन्यांची संख्या आणि स्पर्धात्मकता या विषयावर का बोलत नाहीत, हे समजेल ... 

जाता जाता फारसं सांगत नाही, पण आत्मपरिक्षण करा ...... प्रश्न मांडणारी पत्रकारिता करू नका, प्रश्न सोडवणारी पत्रकारिता करा ..... प्रश्न तर लोकसभा आणि विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासातही मांडले जातात .... त्याचं पुढे काय होतं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे .......  हे सगळं सांगायचं तात्पर्य असं की जाता जाता ही मी तुम्हाला डोस देऊन जाणार आहे. विशेष म्हणजे आऊटपुट डेस्कवरच्या मंडळींनी व्याकरणावर भर द्यावा .... टिकरची एक चुक आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकते याचा अनुभव आपण घेतलेला आहे. टिकरची जबाबदारी ही काही लोकांसाठी दुय्यम दर्जाची आहे. पण माझ्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी सक्षमपणे पार पा़डणाऱ्या व्यक्तीच्या करिअरला कधीही धोका निर्माण होत नाही ..... आणि मला टिकरवर चुक दिसली तर मी नक्कीच डेस्कवरच्या ७०१५ या क्रमांकावर फोन करून त्रास देणार आहे.... 
शेवटी, जाता जाता ...... चॅनलसाठी काम करा, व्यक्तीसाठी नव्हे .... व्यक्ती असते किंवा नसते, चॅनल तिथेच असतं आणि ते मोठंही होत असतं  ......
सर्वाना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .... नवीन वर्ष हे मराठी चॅनल्ससाठी अत्यंत भरभराटीचं जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद 
जय हिंद, जय महाराष्ट्र