Saturday 22 March 2014

छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणी शिक्षेचा फैसला सोमवारी



मुंबई : महालक्ष्मी येथील निर्जन शक्ती मिलच्या आवारात असहाय्य टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या चौघा नराधमांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि पाशवी स्वरूपाचा असल्याचे मत प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी यांनी शिक्षा सुनावताना व्यक्त केले. आणखी एका पीडित छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणी शिक्षेचा फैसला न्यायालय येत्या सोमवारी जाहीर करणार आहे. 


मुंबईची अब्रू वेशीला टांगणार्‍या तसेच संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या शक्ती मिलमधील सामूहिक अत्याचाराच्या दोन घटनांप्रकरणी सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच जणांना दोषी ठरवले. यातील विजय जाधव (१९), मोहम्मद कासिम हाफीज शेख ऊर्फ कासिम बंगाली (२१), मोहम्मद अन्सारी (२८) आणि मोहम्मद अशफाक शेख या चौघा नराधमांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आरोपींच्या कुटुंबाचा विचार करून त्यांना कमीत कमी शिक्षा सुनावली जावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने या वेळी करण्यात आला. तथापि, गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन न्यायालयाने नराधमांना दया न दाखवता बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला. या गुन्ह्यामुळे पीडित तरुणी तसेच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. हा गुन्हा म्हणजे जीवनाच्या मौलिका अधिकाराचे उल्लंघन आहे. याबरोबरच अत्याचाराच्या गुन्ह्याने पीडित तरुणीला दिलेल्या मानसिक यातनाही विचारात घेतल्या पाहिजेत, असे मत व्यक्त करत सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप सुनावली. 

आरोपींच्या हातून घडलेला गुन्हा आकस्मिक नव्हे तर तो पूर्वनियोजित कट आहे, असेही प्रधान सत्र न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी यांनी या वेळी नमूद केले. न्यायालयाने गुरुवारी दोन्ही अत्याचार प्रकरणांतील पाच आरोपींना भादंवि कलमांतर्गत सामूहिक अत्याचार, संगनमत करणे, कट रचणे, अनैसर्गिक संभोग, गुन्हेगारी हेतू, हल्ला, पुरावे नष्ट करणे आदी आरोपांखाली दोषी ठरवले. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गतही आरोप ठेवण्यात आले आहेत. मुंबईकर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणार्‍या या दोन्ही घटनांच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने अवघ्या सात महिन्यांत घोषित केला आहे. त्यामुळे पीडित भगिनींना वेळीच न्याय मिळाल्याचे समाधान महिला वर्गात व्यक्त केले जात आहे.