Wednesday 27 August 2014

'गल्लीन्यूज'ला सोशल मीडिया पुरस्कार

मुंबई - व्हॉटस्‌ऍप व इतर नवीन सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून बातम्या पोचवण्याचे काम करणाऱ्या "गल्लीन्यूज ग्रुप‘ला बेस्ट सोशल मीडिया पुरस्काराने गौरवण्यात आले. बिर्ला मातुःश्री सभागृहात नुकताच हा पुरस्कारप्रदान सोहळा झाला. सोशल एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशन (सेवा) संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. 

सेवाचे अध्यक्ष तथा मुंबई म्हाडाचे अध्यक्ष ऍड. युसूफ अब्राहणी, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार जनार्दन चांदूरकर, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. "गल्लीन्यूज‘चे प्रतिनिधी सलीम शेख व अझीम शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सोशल मीडियाद्वारा पत्रकारिता करणाऱ्या "गल्लीन्यूज‘ला जानेवारी 2014 मध्ये सुरवात झाली. व्हॉटस्‌ऍप ग्रुप, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाद्वारा हा ग्रुप कार्यरत आहे. अल्पावधीतच या ग्रुपने मुंबई, ठाणे, मुंब्रा परिसरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या ग्रुपतर्फे मुंबई व परिसरातील एकूण पाच लाख नागरिकांना संदेश पाठवले जातात, तर या ग्रुपच्या वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या महिन्याला 15 लाख इतकी आहे.
दैनिक "सकाळ" मधून साभार