Wednesday 1 October 2014

निवडणुकीमध्ये वृत्तवाहिन्यांना अच्छे दिन आले

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवण्यात मिडियाचा मोठा रोल होता. विशेष करून सोशल मिडिया आणि वृत्तवाहिन्यांनी यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. यामुळे जर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकतात मग आपण आमदार का बनू शकत नाही अशी स्वप्ने महाराष्ट्रातील प्रत्तेक उमेदवाराला पडू लागली आहेत. यामुळेच वृत्तवाहिन्यांवर उमेदवारांच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी पेड न्यूज म्हणून लाखो रुपये उमेदवारांकडून घेतले जात असल्याने वृत्तवाहिन्यांना अच्छे दिन आले आहेत.

उमेदवार किती मोठा आहे, त्याचे राजकीय वजन किती, त्याची संपत्ती किती, तो किती रुपये खर्च करू शकतो यावरून दीड ते दहा लाख रुपये प्रत्तेक उमेदवारांकडून वसूल केले जात आहेत. निवडणूक कार्यालयात वेगळे मिडिया सेल बनवण्यात आले आहेत. वृत्तवाहिन्यावरून प्रसारित होणाऱ्या या बातम्यावर मिडिया सेलचे बारीक लक्ष असले तरी या सेल मधील अधिकारयांना पेड न्यूज पकडता येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी पैसे घेतलेल्या उमेदवाराच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराच्या बातम्याही फुकट दाखवल्या जात आहे. 

बहुतेक उमेदवार वृत्तवाहिन्यांवर आपल्या बातम्या दिसायला हव्यात असा आग्रह धरत असल्याने वृत्तपत्रांना पेड न्यूज मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. वृत्तपत्रातील पत्रकारांना उमेदवारांकडून खाली हात परत फिरावे लागत आहे. तरीही काही वृत्तपत्रांनी आपले पेड न्यूज साठी प्याकेज उमेदवारांकडे पोहोचवले आहे. बहुतेक सर्व वृत्तपत्रे ५-६ हजारापासून २० रुपयांपर्यंत एक बातमी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.  

तर ठोकमत, सुकाळ, जुनाकाळ, रुढारी, जुनाभारत, तुम्हारा महानगर, अश्या सर्वच वृत्तपत्रांनी आपल्या पत्रकारांना कामाला लावले आहे. प्रत्तेक उमेदवारांकडून दोन ते पाच आणि आठ लाखाचे प्याकेज घेतल्याशिवाय बातम्यांना हात लावू नका असा फतवा काढला आहे. निवडणूक आयोगाच्या रडार वर पेड न्यूज असल्या तरी म्हणावी तशी पेड न्यूज देणारे आणि वृत्तपत्रातून, वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पेड न्यूजचे फ्याड वाढतच चालले आहे.