Thursday 20 November 2014

रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थाचे काम माध्यमांनी समाजापुढे आणावे - न्यायमूर्ती सिरपूरकर


नागपूर :
 ‘विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचे मोठे आव्हान सध्या माध्यम क्षेत्रापुढे आहे. अनिष्ठ बाबींवर तीव्र प्रहार करण्याबरोबरच समाजात रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचे काम समाजापुढे आणायला हवे. या कृतीतूनच माध्यमक्षेत्र पारदर्शकतेकडे वाटचाल करु शकेल’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयेजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्या. विकास सिरपूरकर बोलत होते. राष्ट्रीय पत्रकार हा दिवस दरवर्षीच साजरा करण्यात येतो. यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियातर्फे एक विषय दिला जातो. यावर्षी ‘सार्वजनिक कामकाजातील पारदर्शकता : माध्यमांची भूमिका’ हा विषय होता.

याप्रसंगी दैनिक भास्करचे समूह संपादक व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य प्रकाश दुबे हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक मोहन राठोड, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी दिलीप कुलकर्णी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव शिरीष बोरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. एम. त्रिपाठी, सचिव अनुपम सोनी उपस्थित होते.

न्या. विकास सिरपूरकर म्हणाले की, पत्रकारिता हे बौद्धिकस्तरावरचे काम आहे. उच्च बौद्धिकस्तराचा माणूसच चांगला पत्रकार असतो. प्रिंट मीडियामध्ये पत्रकार लेखनाचे काम करीत असतो. लिखित स्वरुपाचे काम हे अक्षय असते म्हणून आजही प्रिंट मीडियावर लोकांचा अधिक विश्वास आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून निखळ सत्य मांडण्याचे काम पत्रकारांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या माध्यम क्षेत्रापुढील असलेल्या विविध आव्हानास कशा रीतीने सामोरे जाता येईल यासाठी लागणाऱ्या उपाय योजनेसाठी तिसऱ्या वृत्तपत्र आयोगाच्या स्थापनेची गरज असल्याचे प्रकाश दुबे यांनी सांगितले. पत्रकारिता क्षेत्रात विविध साधनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याचबरोबर पत्रकारांनी अधिक संवेदनशील असण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, शिरीष बोरकर यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अनुपम सोनी यांनी केले. दिलीप सोनी यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, राहुल पांडे, विश्वास इंदुरकर, जोसेफ राव, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांच्यासह पत्रकार, नागरिक यावेळी उपस्थित होते.