Thursday 20 November 2014

प्रसार माध्यमांनी पारदर्शक होण्याची गरज - गावकर


पणजी : 
माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आणि महत्त्चाचा खांब आहेत. हा खांब लोकशाहीच्या इतर तीन खांबांवर लक्ष ठेवण्याचे काम करतो. त्यासाठी माध्यमांनी पारदर्शक होण्याची गरज असल्याचे मत गुजचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा तर्फे आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 
किशोर नाईक गावकर म्हणाले की, आजच्या काळात लोकशाहीचे तीन खांब असलेल्या प्रशासन, विधीमंडळ आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये अंतर वाढत चालल्याचे दिसते आहे. एकमेकांच्या कामकाजामध्ये होणाऱ्या हस्तक्षेपामुळे हे अंतर वाढत आहे. तसेच प्रसार माध्यमांची परिस्थितीही सध्या अशीच होत आहे. लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या काळातील पत्रकारिता ध्येयवादी होती, असेही त्यांनी सांगितले.

परिस्थिती बदलण्यासाठी पत्रकारांनी अभ्यास वाढवण्याची आणि समाजातील परिस्थितीचा जवळून अनुभव घेण्याची गरज आहे. तसेच सध्या या क्षेत्रामध्ये स्पर्धा आणि व्यावसायिकता वाढलेली आहे. पण, पत्रकारितेचा आत्मा टिकून आहे. शासकीय योजना त्यांची माहिती, लोकोपयोगी योजनांची माहिती समाजापर्यंत पोचवण्याचे काम पत्रकार करु शकतो. त्यामुळे सार्वजनिक कामकाजातील पारदर्शकतेमध्ये पत्रकार हा महत्त्वाचा असतो असे गावकर यांनी नमुद केले.

पत्रकारांनी समाजामध्ये होणाऱ्या चांगल्या कामांना आवर्जून प्रसिद्धी द्यावी, असे मत महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले. याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप चव्हाण यांनी केले.