Thursday 20 November 2014

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पारदर्शकतेची गरज - भारतकुमार राऊत


पुणे : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सार्वजनिक पारदर्शकतेची नितांत गरज आहे. याचबरोबर माध्यमातही ही पारदर्शकता खोलवर रूजण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जेष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी येथे केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ, विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या कमीन्स सभागृहात आयोजित केलेल्या `राष्ट्रीय पत्रकार दिन` कार्यक्रमात श्री. राऊत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. महेंद्र बडदे होते. यावेळी पुणे शहरातील पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, संपादक, पत्रकार, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र विद्या विभागातील विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

राऊत म्हणाले, माध्यमांतील काम करणाऱ्या मंडळीनी कितीही सांगितले की, आम्ही स्वतंत्र आहोत पण यामध्ये फारसं तथ्य नाही. पारदर्शकतेसाठी स्वातंत्र्य असायला हवं, असलेल्या स्वातंत्र्यातून पारदर्शकतेसाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहायला हवं. वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठीही याची आवश्यकता आहे. सरकार, संस्था, संघटना, सार्वजनिक जीवनातील व्यक्ती यांच्यावर याबाबतीत एक प्रकारचा दबाव असतो पण पारदर्शकता टिकवण्यासाठी नैतिक धारिष्ट्याची नितांत आवश्यकता असते. शासन, स्वयंसेवी संस्था, विविध प्रकारच्या संघटना, सार्वजनिक जीवनातील व्यक्ती हे पारदर्शकता आणतात किंवा कसे हे पाहण्याची मोठी जबाबदारी आज माध्यमांच्या वर आहे.

सत्य शोधनाच्या नावाखाली आज सनसनाटीपणा करण्याकडे माध्यमांचा कल आहे हे मूळ भूमिकेशी विसंगत आहे. सार्वजनिक जीवनात जे घडत ते समाजासमोर जसेच्या तसे आले पाहिजे ही भूमिका माध्यमांनी बजवावी. केरसुणीलाच जर कचरा असेल तर ती नीट कचरा काढू शकणार नाही. तसेच लेखणीतच गढूळ शाई भरलेली असेल तर ती चांगले लिहू शकणार नाही. याचा माध्यमांनी आत्मचिंतनपूर्वक विचार करायला हवा. शासन असो किंवा सामाजिक जीवनात विविध संस्थांच्याकडून माहिती घेताना आकडे फेकले जातात. जनता ते आकडे वाचते. पण या आकडेवारीची पृथ:करण करण्याची मोठी जबाबदारी माध्यमांच्यावर असून याद्वारेच पारदर्शकता अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे सचिव सुनीत भावे यांनी आभार मानले.