Thursday 20 November 2014

पारदर्शकतेसाठी प्रसारमाध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करावे - कैलास म्हापदी


ठाणे : सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता रुजावी म्हणून प्रसारमाध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन दै.जनादेशचे संपादक कैलास म्हापदी यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्यावतीने माहिती कार्यालय येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक शैलेश लांबे उपस्थित होते. 

म्हापदी म्हणाले की, बातमीचा पाठपुरावा हा पत्रकारितेचा आत्मा आहे. संवेदनशील विषयाचा पाठपुरावा करणेही महत्वाचे आहे. रेडीओ ते सोशल मीडियापर्यंत अनेक माध्यमे आहेत. तथापि, प्रिंट मीडियावर लोकांचा विश्वास कायम असल्याने प्रिंट मीडियाची जबाबदारी अधिक वाढली आहे. वाचक आपले ग्राहक आहेत, हे माध्यमांनी कार्य करताना लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी पत्रकारितेच्या क्षेत्रात कष्ट होते परंतु प्रसारमाध्यमांच्या अत्याधुनिक व अद्ययावत यंत्रणेमुळे कामकाज सुलभ व गतीने होत आहे. प्रसारमाध्यमांच्या बळकटीकरणासाठी पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांनी एकमेकांच्या हातात हात घालून सहकार्य व सांघिक भावनेने काम करावे. 

लांबे म्हणाले की, प्रसारमाध्यमांची गतिमानता लक्षात घेता सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे. यामध्ये सोशल मीडिया, फेसबुक, व्हाॅट्सअॅप, व्टिटर आदीसारखे महत्वाचे बदल पत्रकारांनी आत्मसात केले पाहिजेत. सार्वजनिक कामकाज पारदर्शकतेसाठी सोशल मीडियाचा वापर करणे गरजेचे आहे. सोशल मीडिया बळकट झाला असून आता पत्रकारितेवर जास्त जबाबदारी आली आहे.

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.सं.शि.खराट यांनी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्याबाबतचे महत्त्व प्रास्ताविकात सांगितले. यावेळी दै.महाराष्ट्र सम्राटचे संपादक चंद्रकांत भोईटे व सुनील टाकळकर यांनी लिहिलेल्या `कन्व्हेअन्स आणि डीम्ड कन्व्हेअन्स हाऊसिंग सोसायटी` या पुस्तिकेचे प्रकाशन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार एस.रामकृष्णन, संपादक विजय जोशी तसेच मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारसंघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी आभार मानले.