Thursday 20 November 2014

परभणीत पत्रकारावर हल्ला

परभणी - दैनिक गावकरीचे पत्रकार मोहसीन खान यांच्यावर १९ नोव्हेंबरला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही गुंडांना पोलिसानी तडीपार केल्यावर एक प्रेस नोट काढण्यात आली. प्रेस नोटच्या आधारे सर्वच वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. परंतू काही समाज कंटकांनी बातमी का दिलीस असे विचारात मोहसीन खान यांच्यावर भररस्त्यात हल्ला केला.

या हल्ल्यात मोहसीन यांच्या पायाला आणि डोक्याला जबर मार लागला आहे. या घटने नंतर परभणी शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून आरोपींवर त्वरित कारवाई करावी असे निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यानी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. या हल्ल्याचा परभणी जिल्हा पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्या नंतर पत्रकारांवर हा नववा हल्ला आहे.