Thursday 20 November 2014

व्यवस्था सुधारणेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची - धीरजकुमार

नांदेड : माध्यमांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. माध्यमांकडे सर्वसामान्य खूप अपेक्षेने आणि आशेने पाहतो. लोकांचा दबलेला आवाज, न सुटलेले प्रश्न यांच्यासह व्यवस्था सुधारणेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक कामकाज पारदर्शकता : माध्यमांची भूमिका याविषयावर अध्यक्षीय भाषणात कुमार बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धनदास बियाणी, उपाध्यक्ष अविनाश पाटील, बजरंग शुक्ला, महेश राजे, योगेश लाटकर, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, कमलाकर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, प्राचार्य व्ही.एन. इंगोले, वरक-ए-ताजाचे संपादक महमद तकी, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, व्यंकटेश चौधरी, पंढरीनाथ बोकारे आदी उपस्थित होते.

कुमार म्हणाले, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या युगात माध्यमांची भूमिकाही वाढली आहे. माध्यमांनीही सजगपणे स्वातंत्र्याचा वापर करणे अपेक्षित आहे. अमर्याद स्वातंत्र्य आणि पक्षपाती चुकीमुळे समाजाला मोठी किंमत मोजावी लागेल. प्रशासनात पारदर्शकता असावी हा आग्रह मान्यच आहे. व्यावसायिक बंधनाचा चक्रव्यूह भेदणे हे माध्यमांसमोरचे आवाहन आहे. त्याचबरोबर शक्ती ओळखून, तिचा अचूक वापर करण्याची जबाबदारीही माध्यमांवर येते. त्यामुळेच नव व्यवस्था निर्मितीमध्ये माध्यमांनी योगदान देणे आवश्यक आहे.

काळे म्हणाले, भारतीय समाज विकासाच्या टप्प्यातून जात असताना, त्याची गरज आणि माध्यमांचीही भूमिका बदलली आहे. आता समाजाची आर्थिक प्रगती आणि जीवनमान उंचावणे या गोष्टी साध्य करण्याची गरज आहे. मुक्त अर्थव्यवस्थेत पारदर्शक प्रशासन हे अभिप्रेतच आहे. त्यासाठी आता माहिती तंत्रज्ञानाचाही योग्य वापर करणे जरूरीचे बनले आहे. समाजाभिमुख माध्यम आणि पत्रकारिता ही काळाची गरज आहे. नव्या समाज बांधणीसाठी दोन्ही घटकांनी मिळून प्रयत्न करावे लागतील.

प्राचार्य इंगोले म्हणाले, पारदर्शकता ही बाब लोकशाही, प्रशासन आणि पत्रकारिता यांच्यासाठी मध्यवर्ती आहे. लोकशाही यशस्वी होण्यासाठी, सुशासन येण्यासाठी आणि उत्तरदायित्त्वाची भावना वाढीस लावण्यासाठी माध्यमांना त्यांची परंपरा जपावीच लागेल. त्याचबरोबर आता या क्षेत्रासाठी ज्यांच्याकडे आकलन आणि चांगली क्षमता असेल असे चांगले मनुष्यळ यावे लागेल.

डोईफोडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काही काळ माध्यमांसाठी आव्हानात्मक होता. माहितीचा अधिकार कायदा 2005 आल्यापासून परिस्थिती काही अंशी बदलली आहे. तरीही कामकाजातील पारदर्शकता हा नेहमीच माध्यमांसाठी महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. माध्यमांमुळे अनेक लोकहिताचे आणि समाजोपयोगी निर्णय झाल्याची उदाहरणे आहेत. सर्वसामान्य आणि समाजहितासाठी माध्यम आणि प्रशासनाची युती व्हावी लागेल. समाजाप्रती संवेदनशील भूमिका घेण्याने या दोन्ही घटकांमुळे अनेक चांगले बदल अनुभवता येतील.
जिल्हा पत्रकार संघाचा शौचालय बांधणीसाठी पुढाकार

स्वच्छता अभियानात जिल्हा पत्रकार संघ सक्रीय सहभाग घेणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शौचालय बांधणीच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वपरिने सहकार्य देऊन काही शौचालय बांधून देणार आहे. त्यासाठी उत्स्फूर्त निधी उभारण्यात येणार असल्याचे बियाणी यांनी सांगितले. या प्रतिसादाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी विशेष स्वागत करून पत्रकार संघाच्या‍ भूमिकेचे कौतुक केले.