Wednesday 24 December 2014

‘पुढारी’कार पद्मश्री जाधव पत्रकारिता पुरस्कार खाडिलकर यांना प्रदान

मुंबई मराठी पत्रकार संघा तर्फे देण्यात येणारा ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार दैनिक ‘नवाकाळ’चे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांना राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (२३ डिसेंबर) प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकणार नाही याची आपण खात्री बाळगा, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले. 

लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, डॉ. आंबेडकर, आचार्य अत्रे या पत्रकारितेतील महर्षींच्या स्मृतींना उजाळा देत राव म्हणाले की, हा इतिहास पाहता महाराष्ट्रातील पत्रकार खरोखरच भाग्यवान आहेत, असे म्हणावे लागेल. यापुढील काळात महाराष्ट्रातील पत्रकार महाराष्ट्राने दिलेल्या या श्रेष्ठ पत्रकारांची परंपरा पुढे चालवतील, अशी देशवासीयांची अपेक्षा आहे.

सत्काराला उत्तर देताना नीलकंठ खाडिलकर यांनी मुंबई केंद्रशासित ठेवण्याच्या वादाचा उल्लेख करून राज्यपालांकडे मोहरा करून सांगितले की, समारंभ मुंबईमध्ये होतो आहे, ती मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे! ती महाराष्ट्राची राजधानीच राहिली पाहिजे, असा आग्रह आपणही धरावा. त्यांच्या या विषयाचा उल्लेख करून राज्यपाल राव यांनी ठामपणे सांगितले की, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही अलग करू शकणार नाही, याची आपण खात्री बाळगा. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह प्रमोद तेंडुलकर, संयुक्त कार्यवाह रवींद्र खांडेकर, ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश जाधव आदी उपस्थित होते.