Monday 12 January 2015

फ्रान्सनंतर र्जमनीतील प्रसारमाध्यमावर हल्ला

बर्लिन : फ्रान्सच्या 'चार्ली हेब्डो' साप्ताहिकातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे आपल्या दैनिकात पुन्हा प्रकाशित करणार्‍या र्जमनीच्या एका वृत्तपत्राच्या कार्यालयावर रविवारी हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या आणि पेटते बोळे आत फेकून कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. 
कट्टरवाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या र्जमनीतील या दैनिकाचे नाव 'हॅम्बर्गर मॉर्गनपोस्ट' असे आहे. टॅब्लॉईड आकाराच्या या दैनिकाने 'चार्ली हेब्डो'वरील हल्ल्याचा निषेध म्हणून या साप्ताहिकात छापलेली प्रेषित मोहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे आपल्या आवृत्तीमध्ये छापली होती. प्रसारमाध्यमांना किमान एवढे स्वातंत्र्य तरी मिळायला हवे, या मथळय़ाखाली मॉर्गन पोस्टने ही व्यंगचित्रे छापून हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. मात्र, यामुळे संतापलेल्या कट्टरवाद्यांनी रविवारी दैनिकाच्या हॅम्बर्गर येथील कार्यालयावर हल्ला चढवला. सर्वप्रथम कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आणि नंतर इमारत पेटवून देण्याच्या उद्देशाने पेटते बोळे आतमध्ये टाकण्यात आले. शनिवार आणि रविवारच्या रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही जाळपोळ करण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यावेळी कार्यालयात कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; परंतु खालच्या मजल्यावरील दोन खोल्यांना आगीने पूर्णपणे वेढल्यामुळे तेथील सामान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच इमारतीतील अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने ती आटोक्यात आणली असली तरी काही महत्त्वाचे दस्तावेज आगीत भस्मसात झाले आहेत. 

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. मात्र, त्याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. र्जमनीत मॉपो म्हणून प्रसिद्ध असलेले 'हॅम्बर्गर मॉर्गनपोस्ट' आणि फ्रान्सच्या 'चार्ली हेब्डो'वर झालेल्या हल्ल्याच्या आपापसात काही तारा जुळतात का, याचा पोलीस छडा लावत आहेत. उपहासात्मक लेखन आणि व्यंगचित्रांतून मार्मिक टीका करणार्‍या आणि त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या 'चार्ली हेब्डो' साप्ताहिकाच्या कार्यालयावर गेल्या आठवड्यात कट्टरवादी विचारसरणीच्या शरीफ आणि सईद या कौची बंधूंनी हल्ला चढवला होता. अल कायदाशी संबंधित या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत पत्रकार, पोलिसांसह १२ जणांचा बळी घेतला होता. अखेर दोन दिवसांनंतर झालेल्या चकमकीत या दोघांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. या हल्ल्याच्या निषेधार्थ र्जमनीतील अनेक दैनिकांनी दुसर्‍या दिवशीच्या आपला अंकात 'चार्ली हेब्डो'तील व्यंगचित्रे छापली होती.