Wednesday 7 January 2015

मंत्रालय वार्ताहर संघाचा पत्रकारिता पुरस्कार प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर

प्रतिष्ठेचा मानला जाणारा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा या वर्षीचा पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, जागतिक कीर्तीचे कलावंत प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची पत्रकार दिनाचे औचित्य साधून वार्ताहर संघाने अधिकृत घोषणा केली. लवकरच या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


या वर्षी ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे व सदानंद शिंदे यांच्या निवड समितीने एकमताने प्रकाश जोशी यांची निवड केली आहे. वार्ताहर संघाच्या वतीने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, शेतकरी नेते किशोर तिवारी, राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक शिवाजी मानकर, वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रवीण पुरो, कार्यवाह मंदार पारकर आदी उपस्थित होते.

प्रकाश जोशी यांची पत्रकारितेतील कारकीर्द अजातशत्रू अशीच राहिली आहे. 'केसरी' या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रातून ते नवृत्त झाले. नवीन पत्रकारांसाठी त्यांनी कायम मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. बॉम्बे युनियन ऑफ र्जनालिस्ट या नामवंत पत्रकार संघटनेत कायम सक्रिय राहत त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविल्या. प्रकाश जोशी यांनी काढलेली चित्रे जगभरात वाखाणली गेली. घरी छोटेखानी स्टुडिओदेखील त्यांनी उभारला आहे. वर्ल्ड सीटिझन आर्टिस्ट या संस्थेने त्यांची सल्लागारपदी नेमणूक करून त्यांच्यातल्या कलाकाराला दाद दिली आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.