Wednesday 7 January 2015

स्तंभलेखक, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नेवगी यांचे निधन

मुंबई : दै. 'पुण्य नगरी'चे स्तंभलेखक आणि 'कोटीश्‍वर' या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर यांचे पुणे येथील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने सोमवारी रात्री ११ वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी पत्रकारितेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रभाकर नेवगी केवळ पत्रकार नव्हते, तर ते चांगले नाट्यलेखक, स्फुटलेखक होते. त्यांनी आपली पत्रकारिता नवाकाळमधून सुरू केली होती. त्यानंतर मराठा व सकाळमध्ये काम केले होते. सकाळ वर्तमानपत्रातून त्यांनी नवृत्ती घेतल्यानंतरही ते गप्प बसले नाहीत. आपल्या नवृत्तीच्या काळातही त्यांनी विविध वर्तमानपत्रांतून विपूल लेखन केले. दै. 'पुण्य नगरी'मध्ये त्यांनी 'मिश्किली', 'खमंग' अशी चटपटीत सदरे चालवली. त्यांनी दै. 'प्रहार'मध्येही लेखन केले होते. त्यांचे शिक्षण शिरोडकर हायस्कूल, परळ येथे झाले होते. कोणत्याही प्रसंगावर कोटी करणे त्यांना सहज जमायचे. त्यासाठीच त्यांना 'कोटीश्‍वर' असे टोपणनाव पडले होते. कोणत्याही प्रसंगावर तत्काळ भाष्य करणे, कोटी करणे त्यांच्या हातचा मळच होता. त्यांना नाटकांचीही आवड होती. ते कामगारांमध्ये खूपच प्रसिद्ध होते. त्यांनी कामगार विश्‍वाला प्रकाशझोतात आणण्यासाठी विपुल लेखन केले. त्यांनी 'साहेब' नावाचे एक सुंदर नाटकही लिहिले होते. अतिशय शांत स्वभावाचे तरीही मिश्कील असलेले नेवगी गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दै. 'पुण्य नगरी'चे सल्लागार संपादक राधाकृष्ण नार्वेकर, काशिनाथ माटल, दीपक म्हात्रे, शिवाजी धुरी आदींनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.