Thursday 8 January 2015

पॅरिसमध्ये व्यंगचित्र साप्ताहिकावर दहशतवाद्यांचा हल्ला - १० पत्रकारांसह १२ ठार

पॅरिस (वृत्तसंस्था) - दहशतवाद्यांच्या क्रूर हत्याकांडाने जग पुन्हा हादरले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिक ‘चार्ली एब्दो’च्या कार्यालयावर बुरखाधारी दोन दहशतवाद्यांनी ‘अल्ला हो अकबर’चा नारा देत बेछूट गोळीबार आणि रॉकेट लॉंचर डागून भयंकर हल्ला केला. यात साप्ताहिकाचा संपादक स्टिफन चार्बोनियरसह दहा पत्रकार, दोन पोलीस ठार झाले असून दहाजण जखमी आहेत. महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र साप्ताहिकामध्ये छापल्यामुळे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर फ्रान्ससह जगभरात प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात सिडनी येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर फ्रान्सला दहशतवाद्यांनी टार्गेट केल्यामुळे पाश्‍चिमात्य देशांमध्ये जनता भयभीत झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सकोइस ओलांद यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. हा हल्ला दहशतवादीच असून यामुळे फ्रान्समधील जनतेला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. युरोप न्यूज चॅनेल आणि फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीनुसार दोन बुरखाधारी दहशतवादी ‘चार्ली एब्दो’च्या मुख्यालयात घुसले. त्यांच्याजवळ एके-४७ रायफल आणि दोन रॉकेट लॉंचर होते. ‘अल्ला हो अकबर’चा नारा देत या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे साप्ताहिकातील पत्रकार आणि कर्मचारी सैरभैर झाले. कार्यालयातून बाहेर पडताही आले नाही. सुमारे २० मिनिटे गोळीबार सुरू होता. गोळीबाराच्या आवाजाने साप्ताहिकाच्या संरक्षणासाठी असलेले सहा पोलीस धावत आलेे. पोलिसांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला पण दहशतवाद्यांनी रॉकेट लॉंचर डागले. या हल्ल्यामध्ये साप्ताहिकाचे संपादक स्टिफन चार्बोनियर यांच्यासह दहा पत्रकार, दोन पोलीस ठार तर दहाजण जखमी झाले आहेत. हल्लेखोर गोळीबारानंतर पसार झाले. 

अपहरण करून आणलेल्या कारमधून हल्लेखोर पॅरिसबाहेर सुसाट वेगाने गेल्याचे वृत्त आहे. अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांचा फौजफाटा आणि ऍम्ब्युलन्स कार्यालयाबाहेर धडकल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात राष्ट्रपती फ्रान्कोइस ओलांद यांनी आपतकालीन बैठक बोलावून फ्रान्समध्ये हायऍलर्टचा इशारा दिला. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन दहशतवाद्यांना पकडण्यात येईल असा विश्‍वास व्यक्त केला. 

कार्टूनचा वाद
‘चार्ली एब्दो’ हे फ्रान्स आणि युरोपातील आघाडीचे व्यंगचित्र साप्ताहिक आहे. २००२मध्ये महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापल्यामुळे पहिल्यांदा हे साप्ताहिक चर्चेत आले. त्यावेळी इस्लामी दहशतवाद्यांनी साप्ताहिकाचे कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून कार्यालयाला पोलीस बंदोबस्त आहे. यानंतर २००६, २०११, २०१२ मध्येही ‘चार्ली एब्दो’ साप्ताहिकाने महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापले तेव्हापासून साप्ताहिकाला दहशतवादी हल्ल्याचा धोका जास्त वाढला होता. काही महिन्यांपूर्वी ‘आयएसआयएस’चा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याचे व्यंगचित्र छापले होते तेव्हा दहशतवादी हल्ला करण्याची आयएसआयएसने थेट धमकी दिली होती. 

मी कुणाला घाबरत नाही, सत्य तेच छापणार 
२०११ मध्ये दहशतवाद्यांनी कार्यालयावर बॉम्बहल्ला केला तेव्हा स्टिफन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, माझ्याजवळ काहीच नाही. मी अविवाहित आहे. पत्नी नाही, मुले नाहीत, कार नाही आणि स्थावर मालमत्ताही माझ्या नावावर नाही. मी एकटा आहे. मी कुणाला घाबरत नाही. जे सत्य असेल तेच मी छापणार. कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. 

२०११ मध्ये बॉम्बहल्ला
‘चार्ली एब्दो’च्या कार्यालयावर नोव्हेंबर २०११ मध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला होता. असाच हल्ला ख्रिसमसमध्ये करण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली होती. त्यामुळे ख्रिसमसच्या काळात पॅरिसमध्ये कडोकोट बंदोबस्त होता, मात्र हा बंदोबस्त भेदून दहशतवाद्यांनी अखेर हल्ला केला आहे. 

दहशतवादी हल्ल्यात ठार झालेले चार व्यंगचित्रकार


‘आयएसआयएस’चा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याचेही व्यंगचित्र छापले होते.


‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाचा संपादक स्टिफन चार्बोनियर याला आपला बळी जाईल याची पूर्ण कल्पना होती. त्याने स्वत:लाच (मासिकाचा) बॉम्ब लावून घेतल्याचे कव्हरही छापले होते.