Tuesday 3 February 2015

ज्येष्ठ पत्रकार वसंत प्रधान यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार वसंत प्रधान यांचे मुंबईतील खार येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी अँड़ किसन, कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती निशिता म्हात्रे आणि याले विद्यापीठातील शास्त्रज्ञ दीप्ती प्रधान या दोन कन्या, मुलगा संगीतकार अनीश आणि स्नुषा शुभा मुद्गल असा परिवार आहे. 

वसंत प्रधान यांनी वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्य लढय़ात उडी घेतली. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या प्रधान यांना 'भारत छोडो अभियाना'वेळी कारावासही झाला होता. नंतर दिवंगत ज्येष्ठ पत्रकार ग. म. चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली 'चित्रा' या मराठी दैनिकातून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. १९५६ मध्ये वसंत प्रधान आणि त्यांच्या पत्नीने 'झुंजार' हे सायंदैनिक सुरू केले. १0 वर्ष हे सायंदैनिक प्रधान दाम्पत्याने चालवले. मात्र अनेक अडचणींमुळे नंतर 'झुंजार' बंद पडले. त्यानंतर १९६९ ते १९८४ पर्यंत त्यांनी 'लोकसत्ता'मध्ये काम केले होते. प्रधान यांनी मणी भवन गांधी ग्रंथालयाचे अध्यक्षपदही भुषविले आहे. गांधी स्मारक निधीचे ते मानद सचिव होते. गांधी फिल्म्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांच्याकडे होती. वसंत प्रधान यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.