Friday 13 February 2015

माध्यमांत ’मॉलसंस्कृती’ येेेऊ नये म्हणून जागरूक राहण्याची गरज - रविराज गंधे

नाशिक (प्रतिनिधी) : ’’माध्यमांतील सामाजिक जाणीव हरपत चालली असून नव्या जगतातील पत्रकारांनी माध्यमांत ’मॉलसंस्कृती’ येेेऊ नये यासाठी पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी जागरूक राहण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन सह्याद्री वाहिनीचे निर्माते रविराज गंधे यांनी केले. ’महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार’ संघाच्या जिल्हा शाखा आणि ’दै. मुंबई तरुण भारत’तर्फे आयोजित सामाजिक उपक्रमात माध्यमांची भूमिका या विषयावर दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. 

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या विभागाचे समन्वयक प्रा. श्रीकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते व कुंभमेळा गोदाप्रेमी, नागरी सेवा समिती, सदस्य देवांग जानी, इंदिरानगरच्या सर्वात्मक वाचनालयाचे अध्यक्ष भारत बिरारी, जिल्हाध्यक्ष पद्माकर देशपांडे, कार्याध्यक्ष हेमंत चंद्रात्रे आदी उपस्थित होते. आपल्या वक्तव्यात गंधे यांनी माध्यम क्षेत्रातील विविध मुद्यांचा परामर्श घेतला. पर्यावरण, वाचन-लेखन संस्कृती, शास्त्रीय संगीत अशा माणसाला माणूस बनविणार्‍या, सुखी, समाधानी व सुसंस्कृत बनविण्यासाठी माध्यमांकडून शोध पत्रकारितेद्वारे विशेष प्रयत्न केले जावेत ही काळाची गरज आहे, असे सांगून भारतात राजकारण हाच एकमेव विषय आहे का? असा प्रश्न हल्ली विदेशांमध्ये भारतीय माध्यमांची कामगिरी पाहता वाटत आहे, असेहे म्हणाले. प्रा. श्रीकांत सोनवणे यांनी युवकांमध्ये बोकाळत असलेल्या विविध प्रकारच्या सोशल मीडियावर बोट ठेवले. अमेरिकन संस्कृतीमुळे, निगेटिव्ह असते तीच बातमी असा समज झाला असून तो बदलून पुन्हा आपल्या चांगल्या गोष्टींकडे वळण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक उपक्रम व नव्या आदर्शांना माध्यमांनी चांगल्या रीतीने सादर करावे असे त्यांनी सुचविले. तर सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी सिंहस्थानिमित्त पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवाहन करूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगितले. 

मात्र, माध्यमांच्या मदतीने आम्ही प्रयत्न केल्यावर त्या दिशेने सकारात्मक पाऊल पडले. पर्यावरण जागृतीसाठी गोदावरी नदीतील जिवंत झरे सिमेंटीकरणामुळे बुजले आहेत, ते पुन्हा जिवंत करण्यासाठी आम्ही लढा उभारत असून त्याला माध्यमांची साथ मिळत आहे. माध्यमे कोणालाही मोठे करू शकतात, त्यांनी चांगल्या कामाला उत्तेजन द्यावे, असे त्यांनी सुचविले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्ष हेमंत चंद्रात्रे यांनी केले. आभार सुरेश पवार यांनी मानले. यावेळी गिरीश होशिंग, आफताब खान, फारूख पठाण, संदीपकुमार ब्रम्हेचा, शरद गांगुर्डे, महेश आव्हाड, सिद्धार्थ क्षत्रिय आदींसह पत्रकार व संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
http://mumbaitarunbharat.in/Encyc/2015/2/12/1190321.aspx#.VN1_6eaUcqM