Monday 16 March 2015

तोल ढळलेला मिडिया आणि संघ

'मिडियाचा तोल ढळला आहे', असे मी म्हणतो तेव्हा मिडियातील मित्रांसह अनेकांना स्पष्ट का बोलतो म्हणून माझा राग येतो . ( मग त्यातले काही मला काही दिवस च्यानलवर तोंड वाजवायला बोलवत नाही , मुद्रित माध्यमातले लेख मागत नाहीत ..असो, असो ) असे बोलणे हा माझा नाईलाज आहे . आणखी एक उदाहरण देतो - 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठे फेरबदल होणार , भय्याजी जोशी सरकार्यवाहपदावरून जाणार' आणखी काय होणार आणि त्यांचे जागतिकपातळीवर पडसाद कसे उमटणार अशा बातम्या अलिकडे प्रकाशवृत्त वाहिन्या ( म्हणजे आपला 'इलेक्ट्रॉनिक्स मिडिया' हो !) आणि मुद्रित माध्यमांत अत्यंत ठळकपणे झळकल्या . प्रत्यक्षात भय्याजी जोशी यांची तिसऱ्यांदा सरकार्यवाहपदी निवड झाली...कारण ती होणारच होती . संघाविषयीचे जाणकार असणारे आणि संघाचे बीट गंभीरपणे कव्हर केलेल्यां पत्रकारांना संघात कोणतेही बदल होणार नाही हे माहिती होते . 

संघातले बदल काही असे एखाद्या राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसारखे होत नसतात की तो काही एखाद्या राजकीय पक्षाच्या मंत्री मंडळाचा विस्तार किंवा अस्तित्वात असणाऱ्या मंत्री मंडळाचे होणारे खातेवाटप किंवा खांदेपालट तो नसतो . रा.स्व.संघातल्या अशा बदलांमागे एक नियोजन आणि 'ग्रास लेव्हल' पातळीपर्यंत प्रदीर्घ काळ अंदाज घेत झालेला विविधांगी विचारविनिमय असतो . हे काही लक्षात न घेता , कोणी एकाने आधी बातमी केली आणि मग ती वाहिनी तसेच मुद्रित माध्यमांत फिर..फिर गर्रागर्रा फिरली !

ज्याने ही बातमी प्लांट केली तो ( 'तो' कोण याचा नेमका अंदाज आस्मादिकांना आहे ...) तोंडघशी पडला ते कोणाला कळले नाही मात्र या बातम्या चालवणारा ( पक्षी : मिडिया ) मात्र असा तोंडघशी पडला की त्याचे तोंड अक्षरश: फुटले ... अशा पद्धतीने तोंडघशी पडल्याची जबाबदारी मीडियातील वार्ताहर ते संपादक मार्गे चीफ सब / कॉपी एडिटर / न्यूज एडिटर यापैकी नेमका कोण घेणार आहे ?..बातमी कशी देऊ नये याचा तोल गेलेला आदर्श म्हणजे संघातील कथित बदलांबाबत पिसाटासारख्या चालवल्या गेलेल्या या बातम्या होत्या की नाही , सांगा बरे !

Praveen Bardapurkar 
यांच्या फेसबुक वॉल वरून साभार 
https://www.facebook.com/praveen.bardapurkar?fref=nf