Saturday 4 April 2015

गुटखा भरलेला टेम्पो अडवून १0 लाख मागणारे तोतये पत्रकार गजाआड

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुटखा भरलेला टेम्पो अडवून चालकाकडे १0 लाख रुपये मागणारे तोतये पोलीस व पत्रकारांच्या ९ जणांच्या टोळीला मनोर पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केले. तसेच बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणार्‍या टेम्पोचालक-मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे.

गुजरातमधील वापी येथून २ लाख १६ हजार रुपये किमतीचा गुटखा भरलेला एक टेम्पो रात्री वसईकडे चालला होता. त्या टेम्पोच्या पाळतीवर असलेल्या तारापूर, बोईसर येथील अताउल्ला मार्कण्डेय (३९), हुसेन शेख (४१), शब्बीर मोहम्मद दमणवाला (३५), इब्राहिम खान (२८), इब्राहिम अन्सारी (२८), रोशन झा (२९), सुलतान दमणवाला (४0) या नऊ जणांच्या टोळीने दोन कारमधून त्या टेम्पोचा पाठलाग करून तो टेम्पो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरजवळील चिल्हार फाट्याजवळ अडवून आपण पोलीस व पत्रकार असल्याचे भासवून टेम्पोचालकाला दम दिला व तो टेम्पो लगतच्या धाब्यावर नेण्यास चालकास भाग पाडले. बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी चालकाकडे त्या सर्वांनी १0 लाख रुपयांची मागणी केली.

ही घटना चालकाने भाईंदर येथे राहणार्‍या राजन चंद्रप्रकाश पांडे या आपल्या मालकाला सांगितली. नंतर त्या टोळीने दुसर्‍या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत मालकाकडे मोबाईलवरून १0 लाख रुपये देण्याचा तगादा लावून टेम्पो अडवून ठेवला होता. अखेर कंटाळलेल्या पांडेने थेट मनोर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार सपोनि. एम.आय. पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींपैकी दोघेजण बोगस पत्रकार, तर सात जण तोतये पोलीस असल्याचे चौकशीत आढळले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच अनधिकृत गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी चालक व टेम्पो मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून टेम्पो जप्त केला आहे.