Wednesday 29 April 2015

ठाण्यात रिक्षाचा अपघात घडवून महिला पत्रकाराला मारण्याचा प्रयत्न

ठाणे : ठाण्यात एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकारासोबत मीटरवरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने रिक्षा भरधाव वेगाने चालवून घोडबंदर रोड येथे उभ्या असलेल्या गाडीला रिक्षाची धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालकासह महिला पत्रकारदेखील जखमी झाली. यामुळे स्वप्नाली लाड प्रकरणा नंतरही रिक्षाचालकांची अरेरावी सुरूच असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला आहे. 


सोमवारी रात्रीदेखील अशीच एक घटना ठाण्यात घडली. एका इंग्रजी वृत्तपत्राची महिला पत्रकारने सोमवारी मॉडेला चेक नाका येथून रात्री ११.३0च्या दरम्यान (एमएच/0४/एफसी/९५0८) ही रिक्षा पकडली. त्या घोडबंदर येथील आपल्या घरी जात असताना त्यांची नजर रिक्षाच्या मीटरवर पडली. त्या वेळी मीटर जलद पळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी रिक्षाचालकास त्याबाबत विचारले. त्या वेळी रिक्षाचालकाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तसेच रिक्षाचालक व महिला पत्रकार यांच्यात वादविवाददेखील झाले. त्यानंतर रिक्षाचालक अधिक वेगाने रिक्षा पळवू लागला. त्यातच रिक्षाचालकाने घोडबंदरच्या दिशेने जात असताना सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या एका अज्ञात वाहनाला जाऊन धडक दिली. या धडकीत रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक व महिला दोघेही जखमी झाले. दरम्यान, या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विजय शंकर पांडे (३३) या रिक्षाचालकाला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी दिली.