Wednesday 29 April 2015

रस्ते अपघातात सहा पत्रकार ठार

उत्तर प्रदेशमधील यमुना एक्स्प्रेस वेवर रविवारी (२६ एप्रिल) रात्री झालेल्या दोन विभिन्न अपघातात सहा पत्रकारांना प्राण गमवावा लागला. यामध्ये मुंबईतील खाजगी वाहिनीतील दोन पत्रकारांचा समावेश आहे. विकास सिंग (४0) आणि मीनांग सालोकर (२८) अशी मुंबईतील, तर दिव्यांशू (३0), मनोज कुमार (२७), नुकूल शुक्ला (३३) आणि उमेश कुमार सिंग (३५) ही दिल्लीतील पत्रकारांची नावे आहेत.

वृत्त संकलन करण्यासाठी दिल्लीतील हिंदी खाजगी वृत्तवाहिनीचे पत्रकार उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. वृत्त संकलनाचे काम पूर्ण झाल्यानंतर यमुना एक्स्प्रेसवरून परतीच्या मार्गावर असताना त्यांचे वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या घटनेत चारही पत्रकारांचा जागीच मृत्यू झाला. या वेळेस पत्रकारांच्या गाडीला समोरून येणार्‍या वाहनानेही धडक दिली. यामध्ये वाहनातील तीन जण जखमी झाले. ही घटना उलटून आठ तास होत नाही, तोच यमुना एक्स्प्रेसवर निजहुला येथे रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनास ट्रकने धडक दिली. या घटनेत मुंबईतील दोघा पत्रकारांचा मृत्यू झाला.