Friday 1 May 2015

महिला पत्रकाराशी भेदभाव

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या स्वामी नारायण मंदिराच्या कार्यक्रमात महिला पत्रकाराशी भेदभाव करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा समाजाच्या अनेक थरांतून निषेध झाला आहे. पत्रकार संघटनांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे.

राज्य सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम एका संस्थेने आयोजित केला होता. या वेळी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक या पत्रकारांसाठी राखीव ठेवलेल्या आसनावर बसल्या. त्या वेळी आयोजकांनी त्या महिला असल्याने त्यांना पुढे बसता येणार नाही असे सांगितले. या वेळी रश्मी पुराणिक यांनी भाजपा आमदार तसेच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पुराणिक यांना पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. त्या बसण्यास गेल्या असता आयोजकांनी पुन्हा त्यांना बसण्यास मज्जाव केला.

त्या महिला असल्याने त्यांच्यासोबत हा भेदभाव करण्यात आला. याबाबत विविध महिला संघटना, महिला लोकप्रतिनिधी तसेच महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे देखील महिला पत्रकाराला मिळालेल्या या वागणुकीचा निषेध करणारे पत्रक काढण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील जुन्या प्रथा, भेदभाव सोडून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. आयोजक संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमच्या धर्मात महिला, पुरुष असा भेदभाव करण्यात येत नाही. महिलांना वेगळे बसवून अवमान करण्याची भावना नसते. फक्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती तिथे महिलांनी बसावे, असा आमचा आग्रह होता.