Wednesday 13 May 2015

कार अपघातात पत्रकार प्रियंका डहाळेंचा मृत्यू

नाशिक : आपल्या साहित्यविषयक लेखनाने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केलेल्या युवा पत्रकार प्रियंका डहाळे (३0) यांच्यासह अन्य दोघे महामार्गावरील शहरानजीकच्या पाथर्डी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ठार झाले. 

सोमवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. १४ मे रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने पत्रकार डहाळे या मुंबई येथून खरेदी करून परतत असताना पाथर्डी फाटा भागातील उड्डाणपुलावर त्यांच्या कारची वाळूच्या ट्रकला बसलेल्या धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात डहाळे यांच्यासह कारचालक भुपेंद्रसिंग जोगिंदरसिंग सैनी (६0, रा. मुंबई) व सहप्रवासीही ठार झाला. चित्रपट-नाट्य आणि कला हे प्रियंका यांच्या आवडीचे विषय होते. 'अनावृत्त रेषा' हा त्यांचा काव्यसंग्रह देखील गाजला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशन पदवी घेतली होती. मंगळवारी येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डहाळे यांच्या पश्‍चात आजी, आई, वडिल, बहीण व भाऊ असा परिवार आहे.