Thursday 25 June 2015

"मुंबई मराठी पत्रकार संघ" की राजकीय आखाडा ?

अमृतमहोत्सवी परंपरेचा वारसा सांगणाऱ्या 'मुंबई मराठी पत्रकार संघा'च्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे यंदाही शह-काटशहाचे जोरदार वारे वाहू लागले असून, येत्या २७ जून रोजी होणाऱ्या मतदानानंतर 'सत्तेची सुवर्णसंधी' मिळविण्यासाठी पत्रकारांमधील गटातटांनी कंबर कसल्याने मुंबईच्या मराठी पत्रकारविश्वात आणीबाणीसदृश परिस्थिती उद्भवली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या शिदोरीवर मतांचा जोगवा मागणाऱ्या पत्रकांचा मारा सदस्यांवर सुरू झाला असून अचंबित करणारी आश्चर्यदेखील या गदारोळात उघडय़ावर येऊ लागली आहेत. कसलेल्या राजकीय पक्षांनाही मागे टाकणाऱ्या टोकाच्या प्रचारामुळे, पत्रकार संघात निवडून येण्याने नेमके साधते काय, असा भाबडा प्रश्न नवख्या मराठी पत्रकारांच्याच नव्हे तर नागरिकांच्या मनातही रुंजी घालू लागला आहे.


दक्षिण मुंबईच्या आझाद मैदानावरील 'हन्सा हटमेंट' नावाच्या मोक्याच्या जागेत मुंबई मराठी पत्रकार संघाची बहुमजली वास्तू आहे. यंदा अमृत महोत्सव साजरा करणारी ही संस्था म्हणजे, पत्रकारांची सांस्कृतिक संघटना मानली जाते. पत्रकारांच्या समस्यांसाठी लढा, अन्यायाविरुद्ध आक्रमक संघर्ष अशी 'युनियनबाजी' करण्याऐवजी, नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण, पत्रकार संघाच्या वास्तूचे सुशोभीकरण, निधीसंकलन अशा मवाळ बाबींवरच संघाचा भर असतो. निवडणुकीच्या काळात मात्र, गटातटांमधील संघर्ष आक्रमक होतो. कार्यक्षमतेच्या अभावी पत्रकारितेच्या मूळ प्रवाहापासून बाहेर फेकले गेलेले, लेखन वा अन्य बुद्धिजीवी उद्योगाशी संबंध नसलेले किंवा पत्रकारितेतून निवृत्त झालेले काही मोहरे या निवडणुकीत मात्र हिरिरीने सहभागी होतात. गेली काही वर्षे प्रस्थापित झालेल्या गटाला आव्हान देण्यासाठी परिवर्तन नावाच्या एका गटाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, पत्रकार भवनाची वास्तू आणि निधी उभारणी यावरूनच उभय गट परस्परांवर तुटून पडले आहेत. संघाच्या अध्यक्षपदासाठी तर तब्बल चार 'दिग्गजां'नी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना झाली त्याच दरम्यान मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय अशा संस्था मुंबईत उभ्या राहिल्या. आज या संस्थांना मराठी सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे. या संस्था मराठी संस्कृतीची ओळख बनल्या असताना, ७५ व्या वर्षांत पदार्पण करणारा मुंबई मराठी पत्रकार संघ मात्र दोन-चारशे सदस्यांमध्ये कंपूशाही करीत निवडणुकीची राळ उडवण्यात आणि त्यासाठी लाखोंची उधळण करण्यात मश्गूल असल्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रात चिंताही व्यक्त होत आहे. उमेदवारांचा निवडणूक खर्च हीदेखील चर्चेची बाब बनली असून प्रचारासाठी राजकीय नेत्यांकडूनही आर्थिक सहाय्य घेतले गेल्याचे बोलले जात आहे.

पत्रकार संघाला आर्थिक शिस्त लावण्यावर यंदाच्या निवडणुकीतील सर्वच गटांनी नेटाने भर दिला आहे. याच अनुषंगाने सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमधून पत्रकार संघ नावाच्या या संघटनेच्या आर्थिक कारभारावरही धक्कादायक प्रकाश पडू लागल्याने पत्रकारितेशी नाते असलेल्या राजकीय क्षेत्रासह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये या निवडणुकीची व संघाच्या कार्यशैलीची सुरस चर्चा सुरू झाली आहे. वास्तूचे सुशोभीकरण हा या निवडणुकीत वादाचा मुद्दा ठरला आहे. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरातील अनुभवी व्यक्तीची दरमहा तब्बल ४५ हजार रुपये वेतनावर करण्यात आलेली नियुक्ती, मुदत ठेवी मोडून सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेला लाखोंचा खर्च, सरकारी देणग्यांवरून उभय गटांत उफाळलेला वाद, संस्थेच्या वास्तूला दिवंगत विश्वस्ताचे नाव देण्यावरून निर्माण झालेला संघर्ष, खासदार निधीतून पत्रकार संघाला मिळणाऱ्या ४० लाखांच्या निधीवरून सुरू झालेले कुरघोडीचे राजकारण असे अनेक पैलू यंदाच्या निवडणुकीला लाभले आहेत. आरोप-प्रत्यारोपांचे अडथळे पार करून संघावर कब्जा मिळविण्यासाठी निवडणुकीचे सारे प्रस्थापित मार्ग स्पर्धक गटांनी अवलंबिल्याची जोरदार चर्चा पत्रकारविश्वात सुरू आहे.


दैनिक "लोकसत्ता" मधून साभार 
http://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-marathi-patrakar-sangh-polls-1116875/