Monday 6 July 2015

सह्याद्री वाहिनीची ‘दुरवस्था’

मुंबई / अनुजा चवाथे
एकेकाळी मराठीजनांचे सांस्कृतिक भरणपोषण करणाऱ्या, कल्पकतेने कार्यक्रम सजवून सादर करणाऱ्या दूरदर्शनच्या सह्याद्री या मराठी वाहिनीची सध्या पुरती दुरवस्था झाली आहे. डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवांच्या जमान्यात ही वाहिनी कोणत्या क्रमांकावर ​दिसते याची गंधवार्ताही बहुतेकांना नसून, खासगी मनोरंजन वाहिन्यांच्या टीआरपीच्या शर्यतीतही ही वाहिनी खालच्या क्रमांकावर गटांगळ्या खाताना दिसते आहे.

सह्याद्री वाहिनी राज्यात सर्वदूर दिसत असल्याने तिच्यावरील कार्यक्रमांची पूर्वी फार चर्चा होत असे. गजरा, शब्दांच्या पलिकडले, युवदर्शन, प्रतिभा आणि प्रतिमा, दिग्गज कलाकारांच्या संगीत मैफली असे एकापेक्षा एक कार्यक्रम तसेच, चिमणराव गुंड्याभाऊ, एक शून्य शून्य अशा मालिकांची लोकप्रियता अफाट होती. खासगी वाहिन्यांच्या आगमनानंतर सह्याद्रीची गाडी उतरणीला लागली व आता ती पुन्हा रुळावर येणे कठीण झाल्याची कबुली दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनीच दिली.

'सह्याद्रीला इतर वाहिन्यांच्या तुलनेत मोठा नफा कमावता येत नाही. मात्र, जितका खर्च कार्यक्रमांवर केला जातो तेवढा खर्च भरून निघावा असाच आमचा प्रयत्न असतो. दूरदर्शनच्या इतर भाषिक वाहिन्यांच्या तुलनेत सह्याद्रीकडून चांगले आर्थिक उत्पन्न मि‍ळते. मात्र, हा निधी सगळ्या वाहिन्यांना समप्रमाणात वाटण्याच्या सरकारी धोरणामुळे सह्याद्रीसाठी पुरेसा निधी मिळत नाही', अशी खंत शर्मा यांनी व्यक्त केली.

निधीची चणचण हा मुद्दा आहेच, त्याचबरोबरीने सह्याद्रीमध्ये गेली अनेक वर्षे नवीन भरती झालेली नाही. त्यामुळे पुरेशी टीमही उपलब्ध नाही. दूरदर्शनच्या कारभारासाठी वरिष्ठ पातळीवर नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा टीव्ही माध्यमाशी थेट संपर्क आलेला नसल्याने त्यांना वाहिनीच्या प्रत्यक्ष कामाबाबत फारशी माहिती नसते. त्याचाही मालिकांच्या दर्जावर परिणाम होतो, असे सांगण्यात आले.

सरकारी कामामुळे यशाला मर्यादा
सरकारी पद्धतीने काम केल्याने सह्याद्री वाहिनीच्या यशाला मर्यादा आल्या आहेत. या वाहिनीने स्वतःची बलस्थानेही ओळखली नाहीत. त्याचा परिणाम टीआरपी घसरण्यात झाला, असे युनिक फीचर्सचे संपादक-संचालक सुहास कुलकर्णी यांनी सांगितले. सरकारी माध्यमांना 'लसावि' काढावा लागतो. 'लसावि' ही खालची रेष असल्याने टीव्हीवर दाखवले जाणारे कार्यक्रम एका गटाला चांगले वाटत नाहीत. त्यामुळेही सह्याद्रीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सध्याच्या काळात इंटरनेट, सॅटेलाइट यामुळे जागतिक पातळीवरील मनोरंजनाचा व माहितीचा खजिना उपलब्ध आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आजच्या पिढीची आवड लक्षात घेऊन मालिकांची निर्मिती होत नसेल तर अशा मालिकांना लोकप्रियता मिळणे अवघड, असे सोपे गणित ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी मांडले. प्रदीप भिडे यांनीही मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीपासून या वाहिनीचा प्रवास पाहिला आहे. एखादी मालिका चकचकीत, भव्यदिव्य दिसली की प्रेक्षकांचा ओढा त्या मालिकेकडे जातो. खासगी वाहिन्यांमध्ये मालिकांसाठी एका एपिसोडसाठी ५० हजारांपासून दीड लाखांपर्यंत बजेट मिळते. मात्र, दूरदर्शनवरील मालिकांसाठी ५० हजारही मिळत नाहीत. त्यामुळे मग एका दिवसात अनेक भागांचे चित्रिकरण उरकण्याकडे कल असतो. त्यामुळे दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांनाही थोडे पैसे हातात मिळतात.

दैनिक महाराष्ट्र टाईम्स मधून साभार 
सह्याद्री वाहिनीची ‘दुरवस्था’