Monday 20 July 2015

प्रसार माध्यमांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे - मुख्यमंत्री

अमरावती : समाजातील वास्तव परिस्थिती मांडून शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य कसे फुलेल अशा सकारात्मक दृष्टीकोनातून प्रसार माध्यमांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या वतीने धर्मदाय कॉटन मार्केट जवळ उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर वैद्य होते. यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, महापौर चरणजित कौर नंदा, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ.सुनिल देशमुख, डॉ.अनिल बोंडे, रवी राणा, रमेश बुंदिले, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, तुषार भारतीय आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, प्रसार माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजात चांगले परिवर्तन करण्यासाठी आशावादी धोरण अवलंबून माध्यमांनी सकारात्मक बातम्या प्रसिद्ध कराव्यात. माध्यमे समाजाचे प्रतिबिंब आहेत. विदर्भात शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या कुटुंबाचे पुढे काय होते, त्यांची भावनिक अवस्था काय होते, ती होऊच नये यासाठी त्याच्या खोलात जाऊन त्यावरील उपाय योजना पत्रकारांनी सूचवाव्यात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रसार माध्यमांनी काय काय करावे, या संबंधी जनजागृती करावी. राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी सुद्धा वृत्तपत्रांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी. राज्यातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला जिल्ह्यासह ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी टेक्सटाईल हब, एकत्मिक समुहाच्या (इन्टीग्रेटेड क्लस्टर) माध्यमातून कापूस व सोयाबीन वर प्रक्रिया संबंधीचे आठ उद्योग या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यामुळे येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सामान्यांची दिवसाची सुरुवात वृत्तपत्राच्या वाचनातून होते. पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून न्यूज व्हॅल्यूपेक्षा व्हॅल्यूएबल न्यूज कशी होईल याची दक्षता घ्यावी. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा. पत्रकारांसाठी पेन्शन व सुरक्षिततेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपण चांगली वास्तू तयार करीत आहात यासाठी जे जे काही चांगले करता येईल त्यासाठी शासन निश्चितपणे मदत करेल. पत्रकारितेच्या नावावर गैरप्रकार करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे. खऱ्या पत्रकारांना पत्रकार सुरक्षितता कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे. असा चांगला कायदा करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

वैद्य म्हणाले, अमरावती विभागात उद्योगाला चालना देण्याची आवश्यकता आहे. यातून लाखो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल. उद्योगाअभावी हजारो गुणवंत मुले बाहेर जात आहेत. उद्योग धंद्यातून करिअर निर्माण करण्यासाठी उद्योग निर्माण व्हावेत. विभागाचा जलद गतीने विकास होण्यासाठी विमानतळ सुरु करण्याची गरज आहे. प्रास्ताविक प्रेस क्लब ऑफ अमरावतीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.किशोर फुले यांनी तर आभार त्रिदिप वानखडे यांनी मानले.


बातमी