Monday 20 July 2015

पत्रकारांनी शासन व जनता यातील सेतू होऊन लोकशाही समृद्ध करावी - मुख्यमंत्री

अमरावती : लोकशाहीच्या चारही स्तंभांवर आज विश्वासार्हतेचे प्रश्नचिन्ह उभे आहे. लोकशाही संक्रमण अवस्थेतून जात आहे. अशा काळात पत्रकारांनी शासन व जनता यातील सेतू होऊन लोकशाही समृद्ध करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात आयोजित अमरावती श्रमिक पत्रकार भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रमिक पत्रकार संघाला 10 लाख रुपये देण्याचे जाहिर केले. यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ.सुनिल देशमुख, रवी राणा, रमेश बुंदिले, डॉ.अनिल बोंडे, महापौर चरणजित कौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, श्रमिक पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष यदु जोशी आदी उपस्थित होते. यावेळी श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांनी न्यूज व्हॅल्यूपेक्षा व्हॅल्यूअेबल न्यूज समाजासमोर आणाव्यात. एखाद्या बातमीने जर कुणावरचा अन्याय दूर होत असेल तर त्या कामाला न्याय दिल्यासारखे होईल. पत्रकारांवर लोकशाहीने चौथा स्तंभ म्हणून टाकलेली जबाबदारी माध्यमांनी पार पाडली पाहिजे. एकीकडे समाजात दीपस्तंभासारखे काम करणारे पत्रकार असतांना काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली अधिकार गाजवू पाहतात. शासनावर माध्यमांतून टीका केली जाते, ती टीका देखील प्रशासनाला हलवण्यासाठी गरजेची असते. मात्र ती टीका वस्तुनिष्ठ असावी. शासनातर्फे पत्रकारांना पेन्शन, पत्रकारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करुन देणे याबाबत कार्यवाही सुरु असून लवकरच याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याबाबत अनेक सूचना येत असून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा करण्याचा शासनाचा मानस आहे.

यावेळी पोटे-पाटील यांनी माध्यमांनी लोकप्रतिनिधींचे काम समाजासमोर न्यावे असे प्रतिपादन केले तर खासदार अडसुळ यांनी पत्रकार भवनाच्या माध्यमातून पत्रकार परिषदांसाठी हक्काचे ठिकाण मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रमहर्षी स्व.बाळासाहेब मराठे जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित बिंब प्रतिबिंब या मराठी पत्रकारितेवर आधारित संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शिवराय कुळकर्णी, सूत्रसंचालन रविंद्र लाखोडे तर आभार संजय पाखोडे यांनी मानले.