Sunday 13 September 2015

लालबागचा राजाचा दैनिक मुंबई मित्रवर फौजदारी दावा

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याप्रकरणी दैनिक मुंबई मित्र या वृत्तपत्राविरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. लालबागचा राजाने दै.मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, कार्यकारी संपादक उन्मेष गुजराथी आणि महेश वेंगुर्लेकर यांच्याविरूद्ध शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला असून 14 ऑक्टोबरला या खटल्याची सुनावणी होणार आहे.

नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अफाट गर्दी उसळते. लाखोच्या संख्येने भाविक राजाकडे साकडे घालतात तर तितक्याच संख्येने भाविक आपल्या श्रद्धेप्रमाणे नवसही फेडतात. यादरम्यान राजाच्या संपत्तीत कोट्यवधींची भर पडते आणि त्या निधीचा मंडळाच्या वतीने रूग्ण सहाय्य निधी, डायलिसिस सेंटर, पुस्तक पेढी, ग्रंथालयसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात असे मंडळाचे म्हणणे असून. सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते असलेल्या महेश वेंगुर्लेकर यांनी या मंडळात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना दैनिक  मुंबई मित्रने पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली होती. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे धाबे दणाणलेल्या लालबागच्या राजाने या दैनिकाला चुकीची बदनामीकारक माहिती दिल्याचा आरोप करीत त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 499, 500, 501 आणि 34 अन्वये अॅड.गीतांजली गोलतकर, अॅड . निखील राजेशिर्के आणि अॅड. कुणाल राणे यांनी दाखल केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी एका दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

नवस करून दैनिक बंद का केले नाही ?
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजा मंडळामध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप झाल्यावर मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चौकशीला सामोरे जाऊन मंडळात भ्रष्टाचार नसल्याचे सिद्ध करायला हवे होते. असे न होता थेट न्यायालयात जाऊन वृत्तपत्राविरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. या केसचा निकाल लागायला काही वर्षे लागणार आहेत. तसेच या खटल्याला खर्चही खूप होणार आहे. या पेक्षा लालबागचा राजा मंडळाने आपल्याच मंडपातील गणपतीकडे आपल्या विरोधात बातमी प्रसिद्ध करणारे दैनिक नवस करून बंद का पाडले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.