Tuesday 15 September 2015

देशमुखांचा धुव्वा उडवत जोशी अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या (१४ सप्टेंबर) पार पडलेल्या निवडणुकीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे एस. एम. देशमुख यांचा धुव्वा उडवत पत्रकार यदुनाथ जोशी हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. जोशी हे दै. लोकमतचे विशेष प्रतिनिधी व महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.

सचिवालय जिमखाना येथे निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. समितीच्या सर्व २७ सदस्यांनी या प्रक्रियेसाठी मतदान केले. यदुनाथ जोशी यांना १८ मते तर एस. एम. देशमुख यांना ९ मते मिळाली. निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी आर. एन. गरुड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक (माहिती) शिवाजी मानकर, उपसंचालक (वृत्त) ज्ञानोबा इगवे, वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉ. संभाजी खराट आदी या वेळी उपस्थित होते.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे एस. एम. देशमुख यांनी नेहमी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात आवाज उचलला होता. कृती समितीला पत्रकारांचा आणि पत्रकार संघटनांचा पाठींबा मिळत होता. परंतू गेल्या काही वर्षात बहुतेक पत्रकार संघटनांनी कृती समिती आणि देशमुख यांच्यापासून लांब राहणे पसंद केले होते. त्यातच ते ज्या संघटनेच्या माध्यमातून अधिस्विकृती समितीवर गेले आहेत त्या संघटनेवर प्रशासक नेमल असल्याची चर्चा आहे. यामुळे सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये देशमुख यांना याचा फटका बसला. तर यदुनाथ जोशी हे नागपूरचे आणि मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे असल्याने त्याचा फायदा जोशी यांना झाला आहे.