Friday 25 September 2015

पत्रकारांचा पालिका जनसंपर्क अधिकाऱ्याच्या जेवणावर बहिष्कार

मुंबई महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी बोले तैसा पत्रकार चाले असे चित्र दिसणाऱ्या पालिकेतील पत्रकारांनी बंड करण्यास सुरुवात केली. नेहमी जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात हु कि चू न बोलणाऱ्या पत्रकारांनी चक्क जनसंपर्क अधिकाऱ्याच्या जेवणावरच बहिष्कार घालण्याचा प्रकार गुरुवारी (२४ सप्टेंबर २०१५) घडला आहे.

मुंबई महापालिकेद्वारे गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासंबंधी मॉकड्रील घेण्यात आले. या मॉकड्रीलसाठी पालिकेतील पत्रकारांना नेण्यात आले होते. मॉकड्रील सकाळी असल्याने पत्रकारांच्या दुपारच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दुपारचे जेवण नेहमी प्रमाणे फुकटची सोय करणाऱ्या ठक्कर हॉटेलमध्ये करण्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. मच्छी मटणावर ताव मारणाऱ्या पत्रकारांनी राजस्थानी गोड जेवण मिळणार म्हणून जेवणाची दुसरीकडे सोय करण्यास सांगितले. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दुसरीकडे जेवणाची सोय केल्याचे आश्वासनं दिल्यावर पत्रकारांचा ताफा मॉकड्रीलचे वृत्तसंकलन करण्यास पोहचला.

मॉकड्रील संपल्यावर जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जेवणासाठी दिलेल्या शब्द न पाळता फुकटची सोय असलेल्या ठक्करमध्ये जेवायला चला असे म्हणताच पत्रकारांनी याला विरोध केला. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपल्याला टोपी लावली यामुळे संतापलेल्या पत्रकारांनी जनसंपर्क अधिकाऱ्याच्या फुकटच्या जेवणावर बहिष्कार टाकला . जनसंपर्क अधिकाऱ्याच्या जेवणावर बहिष्कार टाकून पत्रकारांनी थेट पाटील क्यान्टिंग गाठली आणि जनसंपर्क अधिकाऱ्याला शिव्याशाप देत मांसाहारावर ताव मारला.

मुंबई महानगरपालिकेच्या जागेत ठक्कर हॉटेल सुरु आहे. पालिकेचे काही कार्यक्रम असल्यास ठक्कर हॉटेलमध्येच नेहमी पत्रकारांच्या जेवणाची सोय केली जाते. ठक्कर हॉटेल कडून मोफत जेवण दिले जाते परंतू जनसंपर्क अधिकारी यांमध्येही जेवणाची बिले लावून आपला खिसा भारतात असा आरोप करून जनसंपर्क अधिकारी पत्रकारांच्या नावाने खिसे भरत असेल तर जेवणावर बहिष्कार कसा योग्य होता याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान पालिकेतील जनसंपर्क अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पत्रकार संघटनेमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याची ढवळाढवळ जास्तच वाढली आहे. हि ढवळाढवळ पत्रकारांना आता सहन करण्याच्या पलिकडे गेली असल्याने जनसंपर्क अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी जेवणावर बहिष्कार टाकल्याचे पत्रकारांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.