Friday 25 September 2015

'त्या' ब्लॉगर्सना 'शोधा आणि ठार करा' ! - इस्लामी संघटनेचे आदेश

ढाका (बांगलादेश) - बांगलादेशमधील एका इस्लामी संघटनेने "धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सना शोधा आणि ठार करा‘ असे आदेश आपल्या समर्थकांना दिले आहेत. तसेच जगभरातील धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सची यादीही प्रसिद्ध केली आहे. 

"अन्सारुल्लाह बांग्ला टीम‘ नावाच्या कट्टर इस्लामी संघटनेने जगभरातील धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सची नावे प्रसिद्ध केली आहेत. तसेच त्यांना "शोधा आणि ठार करा‘ असे आदेशही आपल्या समर्थकांना दिले आहेत. ब्लॉगर्सच्या यादीमध्ये युके, जर्मनीतील, युएस, कॅनडा आणि स्वीडनमधील ब्लॉगर्सचा समावेश आहे. हा लेखक आणि ब्लॉगर्सच्या अधिकारांवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया ब्लॉगर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या थॉमस ह्यूग्स यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अनिवासी बांगलादेशी ब्लॉगर्स अभिजीत रॉय, मार्चमध्ये वशीकुर रहमान बाबूना, ऑगस्टमध्ये निलॉट चॅटर्जी आणि मे महिन्यात बिजॉय दास यांची बांगलादेशमध्ये हत्या करण्यात आली होती.